अमरावती: शिक्षक मतदारसंघाच्या व त्यापाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसली आहे. आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहेत.
दिवाळीनंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. ही आचारसहिता संपत नाही तोच पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आता सर्कलमधील गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुंतले आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा ३१ डिसेंबर रोजी पार पडली. आचारसंहिता लागू असल्याने या सभेत निर्णय घेता येऊ शकत नाहीत. अशातच सर्वसाधारण सभा ही सध्या लागली नसली तरी येत्या १८ जानेवारीनंतर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थायी समिती सभा तसेच सर्वसाधारण सभेत विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून घेत १०० टक्के निधी खर्चण्यासाठी सदस्यांचे प्रयत्न राहणार आहेत.
बाॅक्स
आचारसंहिता संपताच कामे लागणार मार्गी
सन २०२० या वर्षात विकासकामांना कात्री लागली होती. कोरोना परिस्थितीमुळे निधीत कपात झाली. ही परिस्थिती बर्यापैकी सुधारल्यानंतर शासनाने १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कुठलेही निर्णय घेता आले नाही. त्यामुळे आगामी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत कार्योत्तर मान्यता घेण्यात येईल. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्चालाही मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, हा निधी खर्च करण्याबाबत नियोजन होईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.