पत्रपरिषद : एकल महिला किसान संघटनाअमरावती : कुटुंबाची जबाबदारी आत्महत्याग्रस्तांच्या विधवा पत्नीवर येत आहे. पतीला ज्या अधिकाराची लढाई लढता आली नाही ती लढाई या विधवा एकल महिला संघटनेच्या माध्यमातून लढत आहेत. या विधवांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे या संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. सर्व एकल महिलांना २ हजार रूपये मासिक पेन्शन मिळायला पाहिजे. या महिलांना शासन अनुदान योजना लागू करताना निकषातून सूट मिळायला पाहिजे, गावपातळीवरील शासनसेवा पदभरतीमध्ये या महिलांना प्राधान्य मिळायला पाहिजे, व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्जाची योजना जिल्हा बँकेत सुरू करण्यात यावी, या परिवारातील मुला-मुलींसाठी केजी ते पीजीपर्यंत शिक्षणाची फ्रीशिप योजना सुरू करावी, शेतीचा सातबारा विधवा पत्नीचे नावे करण्यात यावा, या महिलांना सामाजिक सुरक्षा योजना व घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्यात. यावेळी कांता मोगरे, वंदना भोरे, वर्षा सावरे, बेबी वाघ, मंदा अलोने, मनिषा झोले, नलू शेंडे, शांता शेळके, सारिका बरवाई, सुनिता राठोड आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना हवाय हक्क
By admin | Updated: December 15, 2015 00:18 IST