आमसभा : लोकप्रतिनिधींना आचारसंहितेची आडकाठीअमरावती : महानगरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याबाबत नगरसेवकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छतमुळे रोगराई आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप प्रशासनावर झाला. दिवसातून दोनदा फवारणी करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्यात. २६ मिनिट चाललेली सर्वसाधारण सभा लोकप्रतिनिधींच्या गोंधळामुळे काही काळ स्थगित करण्यात आली.महापालिके च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी सर्वसाधारण सभा महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली पार पडली. यावेळी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, आयुक्त अरुण डोंगरे, नगरसचिव मदन तांबेकर हे पीठासीनावर उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेच्या सावटाखाली धोरणात्मक निर्णय घेणे लोकप्रतिनिधींना अशक्य असले तरी डेंग्यूसारख्या जीवघेणा आजाराबाबत थेट महापौरांना लक्ष घालावे लागते. त्यामुळे प्रशासन कोणते काम करीत आहे, असा सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबला पाहिजे, यावरुन नगरसेवक संतप्त झाले. आठ दिवसांपर्यंत कचरा साचून राहत असेल तर कचरा उचलण्याचा कंत्राट बंद करा, अशी मागणी अरुण जयस्वाल यांनी केली. प्रकाश बनसोड, चेतन पवार, मिलिंद बांबल, राजू मसराम, दिंगबर डहाके, सुजाता झाडे, ममता आवारे, संजय अग्रवाल, दीपमाला मोहोड, विजय नागपुरे, धीरज हिवसे आदींनी वाढत्या डेंग्यूच्या आजाराबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी भूषण बनसोड यांनी बंद असलेल्या पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित केला. सण, उत्सवाच्या काळात प्रशासनाने नागरिकांना काळोखात ठेवू नका, अशी आग्रही मागणी केली.
डेंग्यू ; प्रशासनावर नाराजी
By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST