नांदगाव खंडेश्वर : मंत्री, आमदार, खासदार म्हटले की त्यांच्या भोजनाचा थाटही काही औरच असतो. पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठा लवाजमा, असा प्रत्यय नेहमीच येतो. परंतु एखादवेळी रस्त्यावरील हातगाडीवरही जर स्वादिष्ट चव मिळत असेल तर त्याचा मोहसुद्धा टाळता येत नाही. असाच प्रत्यय तालुक्यातील माहुली चोर येथे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या दौऱ्यादरम्यान दिसून आला व माहुलीच्या स्वादिष्ट भज्यांनी पालकमंत्र्यांना भूरळ घातली.तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा आटोपून अमरावतीकडे जात असताना अचानक पालकमंत्र्यांचा ताफा माहुली चोर येथे थांबला आणि पालकमंत्र्यांनी साई सत्यज्योत या छोट्याशा हॉटेलमध्ये भज्यांची मागणी केली अन् सगळे अचंबित झाले. अर्धा तास थांबून पालकमंत्र्यांनी भजींचा आस्वाद घेतल्याची चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. यावेळी पालकमंत्र्यांसोबत स्वीय सहायक अनिल भटकर, तालुक्यातील भाजपाचे नेते राजेश पाठक, नगरसेवक संजय पोपळे, सतीश पटेल, घनश्याम सारडा आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
माहुलीच्या स्वादिष्ट भज्यांची पालकमंत्र्यांनाही भुरळ
By admin | Updated: August 29, 2016 00:05 IST