वीरेंद्र जगताप यांचा सवाल : भूसंपादन रखडले, रस्ता निर्मितीचा प्रश्न कायमअमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मात्र विस्तारीकरणात बेलोरा ते जळू दरम्यान यवतमाळ- अकोला या महामार्गाला जोडणारा चौपदरीकरण रस्ता होणे आवश्यक आहे. त्याशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण विकास अशक्य असल्याचे मत आ. वीरेंद्र जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढल्याशिवाय वाणिज्य स्वरुपाचे विमान सुरू करता येणार नाही. विमानतळाचा विकास व्हावा, यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतु विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या काही बाबी शासन लक्षात घेत नसल्याने ते लांबणीवर पडले आहे. आशेने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या. मात्र राज्य शासन विमानतळाचा विकास करण्याच्या मुळाशी जात नसल्याचे शल्य आ. जगताप यांनी व्यक्त केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विमानतळाच्या विस्तारीकरणास अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा बाह्यवळण रस्ता निर्मितीसाठी १४ कोटी रुपये मंजूर केले होते. चार कि.मी. लांबीच्या या बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १४ कोटी रुपये खर्चाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला होता. परंतु बेलोरा ते जळू या बाह्य वळण रस्ता निर्मितीसाठी १४ कोटी रुपयांचे इस्टिमेंट हे जास्त असल्याचे कारण पुढे करून हा रस्ता शासनस्तरावर निर्माण केला जाईल, असा निर्णय शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पी.एस. मीना यांनी घेतला. परंतु हा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित राहिला. जळू ते बेलोरा हा बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात आला नाही. हा रस्ता निर्माण केल्याशिवाय विस्तारीकरण शक्य नाही, असा दावा आ. जगताप यांनी केला. विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण करताना तांत्रीक दृष्ट्या काही बाबी लक्षात घेवूनच वाटचाल करणे आवश्यक आहे. कोणत्या विकास कामाला प्राधान्य द्यावे, विमानतळाचे विस्तारीकरण करायचे असेल तर बाह्यवळण चौपदरीकरण रस्ता निर्माण केल्याशिवाय ते शक्य नाही, असेही आ. जगताप म्हणाले.
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण रखडले
By admin | Updated: November 14, 2015 00:37 IST