अमरावती : डेहरादून येथील भारतीय वनसेवा विभागाच्या पथकाने मंगळवारी अमरावतीत येऊन येथील वनविभागाची कार्यप्रणाली समजून घेतली. या पथकाला शिकार प्रतिबंधक पथकाचे अमोल गावराने व वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी मार्गदर्शन केले. पश्चिम बंगाल येथील फॉरेस्ट वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युटच्या स्वागता दास व उत्तराखंड येथील वनविभागाच्या आदिती शर्मा यांनी अभ्यासदौऱ्यांतर्गत अमरावतीच्या वनविभागाला भेट दिली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक दिनेश त्यागी यांनी पथकाला वनविभागाची कार्यपध्दती समजावून सांगितली. सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांनी वनविभागातील कार्यप्रणालीचा अनुभव घेतला. शिकार प्रतिबंधक विभागाचे अमोल गावराने यांनी या चमूला रेस्क्यू आॅपरेशनच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. वन्यप्राण्यांना पकडण्याच्या पद्धतीवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. रेस्क्यू आॅपरेशन करताना वन्यप्राण्यांना ‘डॉट’ कसे करावे, नेम कसा धरावा, औषधांचा दाब किती असावा, सर्चलाईटचा उपयोग, दुर्बिणचा उपयोग आदी विविध बाबींवर अमोल गावराने यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘युथ फॉर नेचर कन्झर्व्हेशन’ संस्थेचे अध्यक्ष तसेच वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी अमरावतीच्या वनवैभवाची सविस्तर माहिती देत जिल्ह्यातील विविध वन्यप्राण्यांच्या अधिवासावर सविस्तर माहिती दिली. यावेळी पी.टी.वानखडे, फिरोज खान, सतीश उमक, मनोज ठाकूर, चंदू ढवळे, अमित शिंदे, वीरेंद्र उज्जैनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डेहरादूनचे आयएफएस पथक अमरावतीत दाखल
By admin | Updated: March 20, 2015 00:21 IST