फोटो पी १० दीपाली फोल्डर
नरेंद्र जावरे
परतवाडा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण नऊ वर्षे वनविभागात सेवा केल्यानंतर नोकरी सोडण्याच्या निर्णयाप्रत आल्या होत्या. यासंदर्भात एमपीएससी परीक्षेसाठी आवश्यक असलेले त्यांचे हॉल तिकीट व उपवनसंरक्षक यांना दिलेले सुटीचे पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मोठ्या हुद्द्यावरील वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा प्रचंड छळ करीत असल्याचा आरोप पूर्वीपासूनच केला जात होता. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने हा आरोप बराच बोलका झाला आहे. गुगामल वन्यजीव विभागातर्गत असलेल्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यास वरिष्ठांनी भाग पाडल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले. त्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा आता होऊ लागला आहे. या प्रकरणातील निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा न्यायालयीन कोठडीत आहे. तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याचे नागपूर येथे स्थानांतर करण्यात आले आहे.
बॉक्स
एमपीएससी परीक्षा देऊन झाल्या होत्या आरएफओ
दीपाली चव्हाण २०११ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नियुक्त झाल्या. तीन वर्षे त्यांचे प्रशिक्षण झाल्यावर २०१४ मध्ये त्यांची पहिली नियुक्ती मेळघाटातील धारणी तालुक्याच्या धूळघाट रेल्वे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांचे स्थानांतर हरिसाल येथे झाले. तीन वर्षांपासून त्या येथे कार्यरत होत्या. एकदा एमपीएससीची परीक्षा देऊन निवडलेल्या विभागातच अधिकारी काम करतात. मात्रए दीपाली चव्हाण वनविभागातील त्रासाला कंटाळून नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या एमपीएससी परीक्षेची नव्याने नव्या नोकरीसाठी तयारी करीत होत्या.
बॉक्स
सहा वर्षांत आली अनेक गंभीर संकटे
धुळघाट रेल्वे व हरिसाल येथे चव्हाण यांनी कामाची चुणूक दाखविली. सहा वर्षांत गोंद व सागवान तस्करांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. या सहा वर्षांत त्यांच्यावर अनेक संकटे आली. यातच वरिष्ठ अधिकारी सहकार्य न करता, आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने कंटाळून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे व पुन्हा एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे पुढे आले आहे.
बॉक्स
एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी मागितली होती रजा
दीपाली चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी करून वनपरिक्षेत्र अधिकारी पदाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी त्यांना अमरावती येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज हे परीक्षा केंद्र मिळाले होते. त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी उपवनसंरक्षकांच्या नावे विनंती अर्ज लिहून परीक्षेसाठी सुटीदेखील मागितली होती. मात्र, कोरोनाकाळात परीक्षा रद्द झाल्याने त्या परीक्षा देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर पुनर्वसन व इतर कामांसह अॅट्रासिटी गुन्हा दाखल झाल्याने त्या सतत मनस्ताप झेलत राहिल्या आणि कंटाळून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली.
----------------------------