फोटो पी १२ यशोमती
पालकमंत्री : शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन होणार
तिवसा : विकासकामांसाठी जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पालकमंत्री ठाकूर यांच्या प्रयत्नांतून तिवसा नगर पंचायत क्षेत्रात १०कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यातून तिवसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण तसेच इतर विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मुकुंद देशमुख, अतुल देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, संध्या मुंदाने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तिवसा शहरातील धार्मिक स्थळे, सामाजिक, शैक्षणिक आदी कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, संत शिरोमणी संताजी महाराज सभागृह, नवीन तहसील ते क्रीडा संकुलपर्यंत रस्ता बांधकाम, रतनगीर महाराज मंदिर परिसर सौंदर्यीकरण, महानुभाव मंदिर रस्ता बांधकाम, गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदीर सभागृहाचे सौंदर्यीकरण, गौतम मुंदे गुरुजी ते माध्यमिक विद्यालय रस्ता बांधकाम, अंकुश देशमुख ते खाकसे यांच्या घरापर्यंतचा रस्ता बांधकाम, ओपन जीम व उद्यानाचे सौंदर्यीकरण, गजानन काळे यांच्या घरासमोरील उद्यानाचे सौंदर्यीकरण, आनंदवाडी येथील बुद्धविहाराचे सौंदर्यीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे बांधकाम, घनकचरा डेपोची संरक्षण भिंत व विकासकाम, आनंदवाडी येथील पुलाचे बांधकाम व इतर विकासकाम आदी विविध कामांसाठी पालकमंत्री ठाकूर यांनी निधी मिळवून दिला.