शिक्षणमंत्र्यांना साकडे : शेखर भोयर यांचा पुढाकारअमरावती : शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा व शिक्षकांच्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणारा सेल्फीचा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे.‘सेल्फी’च्या निर्णयामुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार करून हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी मुंबई येथे मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. सेल्फीमुळे शालेय कामकाजावर होणाऱ्या परिणामांबाबत व शिक्षकांचा या निर्णयाला असलेला विरोध लक्षात घेता शिक्षकांशी सविस्तर चर्चा करून भोयर यांनी हा विघातक शासननिर्णय रद्द करण्याचे साकडे शिक्षणमंत्र्यांना घातले. यासाठी भोयर हे सकाळपासूनच मंत्रालयात ठाण मांडून होते. ‘सेल्फी’बाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.भोयर यांच्या आक्षेपानुसार ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये इंटरनेट, वायफायची सोय नाही. बऱ्याच ठिकाणी तर रेंजच नसते. अशा परिस्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी करताना शिक्षकांच्या वेळेचा अपव्यय होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळे हा घातक शासननिर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भोयर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
‘सेल्फी’चा घातक निर्णय रद्द करा!
By admin | Updated: January 11, 2017 00:13 IST