राज्यमंत्र्यांची बैठक : व्यापारी मांडणार कैफियतअमरावती : स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) फरकाची रक्कम माफ करावी, यासाठी सोमवारी १८ मे रोजी मुंबई येथे मंत्रालयात अतिशय महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील घेणार असून जिल्ह्यातील व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर राहतील.चेम्बर आॅफ अमरावती महानगर मर्चन्टस् अॅन्ड इंडस्ट्रिजने एलबीटी फरकाच्या रकमेच्या माफीसाठी मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आदींकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, महापालिका प्रशासनाने एलबीटी फरकाची रक्कम २१ महिन्यांच्या कालावधीत भरण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. कर मूल्यनिर्धारण करताना व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचत असताना कोणीही त्यांची मदत करीत नसल्याची भावना व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, आयुक्त गुडेवार यांनी एलबीटीची रक्कम वेळेत अदा न केल्यास दंड वसूल केली जाईल, अशी ताकिद दिल्याने व्यावसायिक चक्रावून गेले आहेत. परिणामी नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर येथील व्यावसायिकांनी हा बिकट मुद्दा उपस्थित केला असता यासंदर्भात मुंबईत बैठक घऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सोमवारी ही बैठक होणार आहे. बैठकीत पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, किरण पातुरकर, तुषार भारतीय, संजय अग्रवाल, सुरेश जैन, घनश्याम राठी, विजय जाधव हजर राहतील. (प्रतिनिधी)
एलबीटीसंदर्भात आज मुंबईत निर्णय
By admin | Updated: May 18, 2015 00:15 IST