अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाच्या सुरू असलेल्या वादाविषयी सोमवारी १६ जून रोजी फैसला होण्याची दाट शक्यता आहे. सदस्यत्व अपात्र ठरविण्यासंदर्भात दाखल याचिकेवर विभागीय आयुक्तांकडे ही सुनावणी आहे; मात्र सुनावणीकरिता २६ जून ही तारीख ठरविली असताना तडकाफडकी १६ जून ही तारीख निश्चित केल्याने यामागे बरेच राजकारण असल्याचे बोलले जात आहे.विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी १३ जून रोजी अविनाश मार्डीकर व सुनील काळे यांना पत्र पाठवून महाराष्ट्र स्थानिक संस्था अनहर्तता कायदा १९८७ अन्वये अमरावती महापालिका अंतर्गत गट, आघाडीची नोंद घेण्याबाबतच्या विषयावर दाखल याचिकेवर १६ जून रोजी सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. ही सुनावणी अविनाश मार्डीकर यांनी २१ मार्च २०१४ रोजी सादर केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने निश्चित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदाचा वाद हा लोकसभा निवडणुकीदरम्यान निर्माण झाला. नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताच संजय खोडके यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करून पक्ष निर्णयाला आव्हान दिले. परिणामी खोडकेंना पक्षातून बाहेर पडावे लागले. मात्र महापालिकेत खोडकेंचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. २३ सदस्यांपैकी सात सदस्य हे राष्ट्रवादीसोबत गेलेत, १६ सदस्यांनी खोडकेंचे नेतृत्व मान्य केले. पक्षाने राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनील काळे यांच्या नावाची घोषणा केली तर खोडके यांचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेतापदी अविनाश मार्डीकर हे कायम राहिलेत. सुनील काळे यांच्या नावाची सभागृहात अद्यापपर्यत महापौरांनी गटनेता म्हणून घोषणा केली नसल्याने मार्डीकर हेच अधिकृत गटनेता म्हणून कामकाज सांभाळत आहेत. गटनेतापदाविषयीची याचिका मार्डीकर आणि काळे या दोघांनीही विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे. सदस्यत्व अपात्र ठरविण्यासंदर्भात या याचिकेवर लवकर निर्णय लागावा, यासाठी शासन स्तरावरून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप अविनाश मार्डीकर यांनी केला आहे. अपात्रतेविषयीच्या याचिकेवर सुनावणीची २६ जून ही तारीख ठरविली असताना १६ जून ही तारीख ठरविण्यामागे बरेच काही राजकारण दडले आहे, असेही मार्डीकर यांचे म्हणने आहे. परंतु राष्ट्रवादी सोबत गेलेल्या सातही सदस्यांना आतापर्यंत एकही लाभाचे पद मिळाले नसल्याने ते प्रचंड अस्वस्थ आहेत. तर दुसरीकडे सुनील काळे हे गटनेतापदी कायम होण्यासाठी उच्चस्तरावरील ‘फिल्डिंग’ लावण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता अविनाश मार्डीकर की सुनील काळे या वादाविषयी विभागीय आयुक्त बनसोड कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर आज निर्णय?
By admin | Updated: June 15, 2014 23:15 IST