राणांचा सीपींच्या कक्षात ठिय्या : दोन दिवसांचा अल्टिमेटमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार नवजात शिशुंच्या आकस्मिक मृत्युप्रकरणी पीडीएमसीचे डीन डॉ. दिलीप जाणे यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र निस्ताने, डॉ. पंकज बारब्दे आणि डॉ. प्रतिभा काळे या चौघांना त्वरित अटक करण्याची मागणी आ.रवि राणा यांनी केली आहे. गुरुवारी यासंदर्भात आ. राणा यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी मृत शिशुंचे पालक देखील उपस्थित होते. दोन दिवसांत संबंधित डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान आपल्या पद्धतीने त्यांची खबर घेईल,असा इशारा आ.रवि राणा यांनी दिला.पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये चार नवजातांचा चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. भूषण कट्टा आणि परिचारिका विद्या थोरात या दोनच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार शिशुंच्या मृत्युला कट्टा आणि थोरात हे दोघे जबाबदार नसून डीनसह अन्य तीन डॉक्टरही तेवढेच जबाबदार असल्याने त्यांचा परवाना रद्द करावा, अशी आग्रही मागणी आ.राणा यांच्यासह माधुरी कावरे, शिल्पा विरुळकर आणि पूजा घरडे या मातांनी आयुक्तांकडे केली. अन् त्या माता गहिवरल्याअमरावती : शिशुंच्या पालकांनी पोलीस आयुक्तांकडे त्यांच्या व्यथा मांडल्यात. गहिवरलेल्या मातांचे अश्रू यावेळी अनावर झाले होते. ते डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पद, प्रतिष्ठा आणि पैसा आहे, म्हणून त्यांना शिक्षा होणार नाही काय, असा थेट सवाल सीपींना या मातांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली. आमच्या नवजातांच्या जिवांची काहीही किंमत नाही काय, असा सवालदेखील या पालकांनी पोलीस आयुक्तांना केला. ‘शिवाजी’च्या पदाधिकाऱ्यांना माणुसकी नाही ?श्री शिवाजी शिक्षण संस्थेची शाखा असलेल्या पीडीएमसीत चार शिशुंचा मृत्यू होतो आणि संस्थेचा एकही पदाधिकारी पालकांच्या भेटीला येत नाही. त्यांच्या भावना जाणून घेत नाही किंवा त्यांना आर्थिक मदतीचा हातही देत नाही. इतकेच नव्हे, तर रूग्णालयातून सुटी देताना ३०० रुपयेसुद्धा पीडीएमसी प्रशासनाने सोडले नाहीत, हीच का पीडीएमसी आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची माणुसकी, असा सवालही संतप्त पालकांनी केला.
डीनसह निस्ताने, बारब्दे, काळेंना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:19 IST