पान ३ ची लिड
वरिष्ठ अधिकाऱ्यांची जंगलाकडे धाव, आगीला उलट्या बत्तीची आवश्यकता
अनिल कडू
परतवाडा : मेळघाटात अवघ्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणात जंगल जळून खाक झाले आहे. मागील चार दिवसांपासून लागत असलेल्या या आटोक्यात न येणाऱ्या आगी बघता, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जंगलाकडे धाव घेतली आहे.
वणव्याचे उग्र रूप बघता, आग विझविण्याकरिता मेळघाटमध्ये वापरल्या जाणाऱ्या उलट्या बत्तीचीच आवश्यकता निर्माण झाली आहे. यादरम्यान आगींमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभाग, मेळघाट वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभागांसह मेळघाट प्रादेशिक वनविभागातील जंगल मोठ्या प्रमाणात काळवंडले आहे. लहान-मोठ्या मौल्यवान वनस्पती या आगीत जळून खाक झाल्या आहेत. ३३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावली गेलेली रोपही या आगीत नष्ट झाली आहेत.
मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत ३१ मार्चला अंजनगाव वनपरिक्षेत्रातील दहिगाव वतुर्ळातील सीता नानी नियत क्षेत्रातील वनखंड क्रमांक १०४६, १०४७, १०४९, तर टेंब्रुसोंडा वतुर्ळातील गिरगुटी नियत क्षेत्रांतर्गत वनखंड क्रमांक १०४१ मध्ये ३० मार्चला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. अंजनगाव वनपरिक्षेत्रात फेब्रुवारीमध्येही मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. यात दोन रोपवन जळाले आहेत.
धारणी वनपरिक्षेत्र अंतर्गत पाटिया वर्तुळातील गोबरकहू नियत क्षेत्रातील वनखंड ६६३ मध्ये २९ मार्चला, बैरागड वर्तुळातील नियत क्षेत्रात ३० मार्चला ६७०, ६७१, तर वैरागड नियत क्षेत्रातील वनखंड क्रमांक ६६९ मध्ये २९ मार्चला आग लागली. यात मोठ्या प्रमाणात जंगल जळाले आहे.
आग सुरूच
मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट प्रादेशिक वनविभागात चार दिवसांपासून लागलेल्या या आगी वृत्तलिहिस्तोवर अजूनही पूर्णपणे विझलेल्या नाहीत. या आगी आजही सुरूच आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न वन व वन्यजीव विभागाकडून केले जात आहे. यादरम्यान सॅटेलाईट (उपग्रह) मार्फत फायर अर्लट दिला जात आहे. मेळघाटच्या जंगलात सुरू असलेल्या आगीच्या अनुषंगाने सॅटेलाईटने नकाशाही पाठविला आहे.