अर्धशतकाची यशस्वी वाटचाल : ब्रिटिशकालीन तिजोरीतून दीड लाखांचा नफाधामणगाव रेल्वे : विद्यानगरी म्हणून लौकिकप्राप्त या शहरात सहकार क्षेत्राचा प्रभाव यापूर्वीही मोठ्या प्रमाणात होता़ परिणामी अवसायनात निघालेल्या मल्टिपर्पज सोसायटीचे रूपांतर दत्तापूर खरेदी-विक्री संघात झाले़ संघाजवळ आज तब्बल सहा कोटी रूपयांची मालमत्ता आहे़ धामणगाव शहरात त्याकाळी सहकार क्षेत्र वाढविण्यास शंकरलाल अग्रवाल, सुगनचंद लुनावत, अन्नासाहेब देशमुख, भाऊसाहेब जाधव, विजय उगले यांचा मोठा वाटा होता़ त्यामुळे आजही या क्षेत्रात धामणगाव शहराचे नाव अग्रक्रमावर आहे़ सन १९६७ च्या काळात दत्तापूर मल्टीपर्पज सहकारी संस्था प्रभुदास मलकान यांनी स्थापन केली़ अनेक वर्षे त्यांनी पदभार सांभाळला. परंतु आर्थिक चळवळीत ही संस्था डबघाईस आली. ३ हजार ५०० रूपये व्याज द्यायचे असल्याने ही संस्था त्या काळी मोर्शी येथील सहाय्यक निबंधकांनी अवसायानात काढली़ सहकारात पारदर्शकपणा बाळगणाऱ्या शंकरलाल अग्रवाल यांनी त्यावेळी साडेतीन हजार रूपयांचा भरणा करून ही संस्था चालविण्यास घेतली़धामणगाव हे औद्योगिक शहर म्हणून आजही ओळखले जाते़ त्याकाळात कापसाचा मोठा व्यापार असल्यामुळे शंकरलाल अग्रवाल यांनी कापडाचे दुकान, स्वस्तधान्य दुकान, कापूस खरेदी-विक्री केंद्र उघडून सन १९६९ ते ७४ च्या काळात या संस्थेला प्रगती पथावर नेले. अंकेक्षणात ‘अ’ दर्जा प्राप्त करून दिला़ ‘एक तालुका एक खरेदी-विक्री संघ’ अशी शासनाची त्यावेळेची भूमिका असल्याने व धामणगाव शहर हे तिवसा तालुक्यात येत असल्यामुळे या तालुक्याला खरेदी-विक्री संघाचा दर्जा मिळणे अपेक्षित नव्हते़ परंतु सहकार नेते़ अग्रवाल यांनी तत्कालीन सहकारमंत्री कल्याणराव पाटील यांची भेट घेऊन धामणगावात खरेदी-विक्री संघाची निर्मिती कशी करायची, यावर चर्चा केली. याविषयी जळगाव येथे एकाच ठिकाणी असलेल्या दोन खरेदी-विक्री संस्थांविषयी माहिती पटविल्यानंतर दत्तापूर खरेदी-विक्री संघाची स्थापना करण्यात आली. सहकारात पारदर्शकता यावी म्हणून दुसऱ्या टप्यात दत्तापूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद विजय उगले यांना देण्यात आले़ सव्वा लाखात जागेची खरेदी करून इमारत उभारण्यात आली. इमारत उभारताना पूर्वीच या जागेवर असलेल्या आॅईल डेपोची टाकी आढळली. या टाकी विक्रीतून संस्थेला ८५ हजार तर ब्रिटिश राजवटीतील जमिनीत आढळलेल्या तिजोरीच्या विक्रीतून ७५ हजार रूपयांचा नफा झाला़ या संस्थेजवळ आज प्रशस्त इमारत, परसोडी रस्त्यावर प्लॉट, गोदाम अशी सहा कोटींची मालमत्ता आहे़ त्याकाळी शंकरलाल अग्रवाल, सुगनचंद लुनावत, माजी आमदार भाऊराव जाधव, दुलिचंद पनपालिया, अण्णासाहेब देशमुख, विजय उगले, शामराव तितरे, अलिकडे काळात गोपाळराव औरंगपुरे, सुरेश जाधव, विनायक होनाडे यांचा संस्था वाढविण्यास मोलाचा वाटा आहे़ सध्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून विकास करणाऱ्यांच्या हाती ही संस्था द्यावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे़
मल्टिपरपज सोसायटीचा झाला दत्तापूर खरेदी-विक्री संघ
By admin | Updated: August 15, 2015 00:47 IST