पान २ ची बॉटम
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : दोघांना जन्मत:च एक डोळा नाही, तर एकाच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो निकामी झाला. एका डोळ्यावर आपले आयुष्य काढत असताना दुसऱ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागल्याने मेडिकल स्टोअरमधून ड्रॉप घेऊन डोळ्यांत टाकले. त्यामुळे की काय, पूर्ण दृष्टीच गेली. मात्र, कोरोनाच्या काळात एका डॉक्टरने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी दिली. त्यामुळे त्या तिघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
धामणगाव शहरातील केजीटीआय परिसरातील गणेश धाडसे यांचा जन्मत:च एक डोळा निकामी. सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या डोळ्यातून पाणी येत असल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता, कुणी तरी सुचविलेला ड्रॉप घेऊन डोळ्यात टाकला. त्यामुळे दुसऱ्या डोळ्याने दिसणे बंद झाले. एकीकडे कोरोनाचा काळ, लॉकडाऊन, अशावेळी आपल्या डोळ्यावर कोण शत्रक्रिया करणार, असा प्रश्न धाडसे यांना सतावू लागला. आता आपल्याला जग पाहता येणारच नाही, या विचाराने त्यांची मनोदशा बिघडली. आपल्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा विचारही त्यांच्या मनात डोकावून गेला. मात्र, शहरातील डॉ. अनूप ठाकरे यांनी त्यांच्या एका डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांच्यामुळे आपल्याला हे जग पुन्हा पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया गणेश धाडसे यांनी व्यक्त केली.
काशीखेड येथील सिंधुबाई जुनघरे या ६५ वर्षीय महिलेला परत सृष्टी दिसली. त्यांचाही एक डोळा जन्मत:च निकामी. दुसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्यामुळे आयुष्य जगण्याची आशा मावळली. कोरोनाकाळात डॉ. ठाकरे यांनी त्यांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आज त्यांना हे जग पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्येच अशोकनगर येथील किसना शेलोकार यांनी मोतीबिंदू झाल्याने डोळ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया केली. दुसऱ्या डोळ्यात बाजारातून आणून ड्रॉप टाकला आणि त्यामुळे त्या डोळ्याने दिसणे बंद झाले. अखेर डॉ. अनूप ठाकरे त्यांच्या मदतीला आले. कोरोनाच्या काळातही त्यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आज या तिघांनाही आपल्या डोळ्यांनी जग पाहता येत आहे.
कोट
बाजारातून कुठलेतरी औषध खरेदी करून ते डोळ्यांत टाकल्याने डोळे निकामी होण्याची भीती अधिक असते. नेहमी नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घेऊनच उपचार करावा. डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय आय ड्रॉप वापरून नयेत.
डॉ. अनूप ठाकरे, नेत्रतज्ज्ञ
धामणगाव रेल्वे
----------------