अमरावती : सणासुदीच्या दिवसामध्ये कुंकूवाला मानाचे स्थान आहे. मात्र आता धार्मिक कार्यक्रमात मिरविणारे कुंकू नागरिकांसाठी घातक ठरायला लागले आहे. नवरात्रोत्सवात कुंकवाची मागणी वाढल्यामुळे कुंकवात अतिरिक्त रासायनिक द्रव्यांचा वापर करुन विक्री होत आहे. हे भेसळयुक्त कुंकू त्वचेवर घातक परिणाम करीत आहेत. मात्र तरीसुध्दा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.हिंदू धार्मिक अनुष्ठानांमध्ये कुंकवाला मानाचे स्थान आहे. एरवी शुभकार्यात मिरविणाऱ्या कुंकवाच्या निर्मितीतही आता भेसळीचे प्रमाण वाढले आहे. सौभाग्याचे लेणे ठरलेले कुंकू सौभाग्यकांक्षिणीच्या कपाळावर घातक परिणाम करीत आहे. शहरात दररोज हजारो किलो कुंकवाची विक्री होत आहे. नवरात्री उत्सवात सात ते आठ टन कुंकू विकले जात आहे. त्यातच नवरात्रोत्सवदरम्यान अंबादेवी परिसरात असणाऱ्या दुकानामध्ये जवळपास ५ हजार किलोच्या कुंकवाची विक्री होत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये कुंकवाची मागणी वाढते. घरोघरी कुंकवाची खरेदी केली जाते. देव-देवताच्या कपाळावर कुंकू लावण्यासाठी सर्व भाविकांची ओढ लागली असते. त्यामुळे या दिवसांमध्ये कुंकवाला प्रचंड मागणी आली आहे. महिलांचे सौंदर्य फुलविणारे विविध प्रकारचे कुंकू बाजारात उपलब्ध आहेत. अनेक जण कुंकू खरेदी करतात. मात्र कुंकू घरी नेल्यावर त्यांचा उपयोग करताना ते भेसळयुक्त असल्याचे लक्षात येत आहे.
भेसळयुक्त कुंकू ठरतेय त्वचेसाठी घातक
By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST