बडनेरा : बडनेऱ्यातील ट्रामा केअर दवाखान्याच्या पिल्लरचे वजनी ग्रेनाईट तारांनी बांधले आहेत. कुठल्याही क्षणी ते कोसळून दुर्घटना घडू शकते. प्रशासनाचे असणारे दुर्लक्ष एखाद्याच्या जिवावर बेतणारे ठरू शकते, अशी स्थिती आहे.
शहरातील ट्रामा केअर दवाखाना उभारून जवळपास दहा वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांपासून येथे आरोग्य प्रशासनाकडून विविध आजारांवर उपचार केले जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या ट्रामा केअरमध्ये सध्या नेत्र शल्यक्रिया होत आहेत. जिल्हाभरातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. दवाखान्याच्या दर्शनी भागात असणाऱ्या गॅलरीचे तीन पिल्लर धोकादायक झाले आहेत. त्याला लावण्यात आलेल्या वजनदार ग्रेनाईट मोकळ्या झाल्या आहेत. त्या केव्हा खाली कोसळतील, याचा नेम नाही. या परिसरात रुग्ण व त्यांचे नातेवाईक दवाखान्याचे कर्मचारी फिरत असतात. अगदी दर्शनी भागात असल्याने या धोकादायक पिलरखालूनच रुग्णांना दवाखान्यात दाखल व्हावे लागते. ही बाब अत्यंत धोक्याची झाली आहे. या ठिकाणी प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष एखाद्याच्या जिवावर बेतणारे ठरू शकते. या वजनी ग्रेनाईट कोसळू नये, यासाठी तारांनी बांधून ठेवण्याची अफलातून उपाय शोधून काढण्यात आला आहे. एकूणच तकलादू कामाचा दर्जा प्रशासनाने तपासणे गरजेचे झाले आहे. आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
--------------
इतरही भागांना तडे
ट्रामा केअर युनिटच्या उभारणीला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या इमारतीचा उपयोग फारसा झाला नाही. तरीदेखील भिंतींचे सिमेंट प्लास्टर गळून पडत आहे. शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात.