चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजना येथे अवकाळी पावसामुळे मधु मक्याचे नुकसान झाले. तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांदूर रेल्वे तालुक्यात थैमान घातले आहे. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.
तालुक्यात पावसामुळे अनेक गावांत गहू, कांदा, हरभरा, मका या पिकांचे नुकसान झाले. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथील शेतकरी सुनील गावंडे यांनी एक हेक्टरमध्ये मधु मक्याची पेरणी केली होती. झाडे मोठी झाल्यानंतर आता सततच्या अवकाळी पावसामुळे उभी झाडे खाली पडत आहे. त्यांना ३५ हजार रुपये लागवडीचा खर्च आला असून, एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, या पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी त्यांनी केली आहे.