जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : काम थांबवून नुकसानभरपाईची मागणी
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथील कॅनॉलसाठी पाईप लाईनच्या खोदकामामुळे शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजुरा येथील रहिवासी राजेंद्र मधुकरराव सोळंके यांचे शेत राजुरा येथे असून, गट नंबर ५११/१ आहे. यामधून सात मीटर व्यासाचा पाईप लाईन कॅनॉल जात आहे. त्यासाठी त्यांची परवानगी न घेता तसेच कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या शेतात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सदर काम अडविले असतांनासुद्धा जबरीने खोदकाम करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला तसेच शेतीच्या नुकसानाची भरपाई मिळालेली नाही.
सदर काम बंद करण्याच्या सूचना द्यावा व झालेले नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राजेंद्र सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या आहेत.
--------------------------------