अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत रोज सरासरी १३७ कोरोना संक्रमितांची नोंद झाली, तर दिवसाला सरासरी १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा टक्का १४.९८ राहिलेला आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल २०२० ला येथील हाथीपुऱ्यात झाली होती. त्यानंतर वर्षभरात तब्बल ५० हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ या महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. सप्टेंबर महिन्यात ७,७९३ व फेब्रुवारी महिन्यात १३,२३० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. जिल्ह्यात वर्षभरात ४९,८२६ रुग्णांची नोंद झाली. यापैकी २१,०२३ (४२.१९ टक्के) रुग्ण या दोन महिन्यांतच निष्पन्न झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा व महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणाद्वारे संसर्ग रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील संर्सगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात या यंत्रणांना यश आले. औषधसाठा, बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सक्रिय रुग्णांसाठी पुरेसे ठरले आहेत.
-------------
दिवसाला दोन बळी
वर्षभरात जिल्ह्यात ६८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजेच दिवसाला सरासरी दोन मृत्यू झाले आहेत. यापैकी ३५० हून अधिक मृत्यू सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१या दोन महिन्यांत झाले. यामध्ये ५० ते ७० वर्षे या वयोगटातील कॉमार्बिड रुग्णांचा अधिक समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.
बॉक्स
संक्रमणमुक्तीचा दर उच्चांकी
कोरोना संर्सगाच्या वर्षभरात ५० हजार पॉझिटिव्हिटीची नोंद झाली, तर याच कालावधीत तब्बल ४६,४३८ रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ९३ टक्के आहे. या कालावधीत एका दिवसाला सरासरी १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उच्चांकी आहे.
बॉक्स
चाचण्यांमध्ये सरासरी १५ टक्के पॉझिटिव्हिटी
जिल्ह्यात वर्षभरात ३,३४,१४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी १४.९८ टक्के राहिली. ५ एप्रिल रोजी २,१३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११.२७ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. या तुलनेत आतापर्यंतची सरासरी जास्त असल्याचे दिसून येते.