विजय भटकर : दादासाहेब काळमेघ यांचे पुण्यस्मरण अमरावती : दादासाहेबांचा दृष्टिकोन विज्ञानाधिष्ठित होता. त्यांची नाळ अध्यात्माशी जुळलेली होती. ते ज्ञानाचा वेध घेणारे द्रष्टे असल्याचे गौरवोद्गार संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी काढले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित ते बोलत होते.स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने गुरुदेव प्रार्थना मंदिरात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आदिंची उपस्थिती होती. एक शैक्षणिक तज्ज्ञ आणि वैज्ञानिक म्हणून दादासाहेबांची उंची महत्तम होती. मात्र त्यांच्या हयातीत मला त्याबाबत साक्षात्कार झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि अध्यात्माची सांगड घालून त्यांनी सत्याचा शोध घेतला. मात्र वर्तमानात जगाने या दोन गोष्टींशी फारकत घेतल्याने जग विनाशाकडे जात असल्याचे भटकर म्हणाले. आध्यात्मिक ज्ञानाशिवाय विज्ञानाच्या गाभ्यापर्यंत जाता येणार नाही, असा संदेश देत भटकर यांनी दादासाहेबांच्या आठवणीला उजाळा दिला. विदर्भाचा वारकरी या पुस्तकाने डॉ.पंजाबराव देशमुख आणि दादासाहेब काळमेघ नव्याने उमगले. दादासाहेबांच्या झपाटलेल्या जीवनकार्यापासून तरुण पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहन भटकर यांनी केले. कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप इंगोले, आबासाहेब बुरघाटे, डॉ.पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे, अन्नासाहेब जवंजाळ, नासाहेब देशमुख, रविकिरण बढे, राजेंद्र कदम, राजेंद्र तायडे, नरेश पाटील, संदीप साखरे, श्रीरंग ढोले, प्रशांत वानखडे, हेमंत काळमेघ आदींसह दादासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आणि दिलीप इंगोले यांनी दादासाहेबांप्रती भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक गजानन भारसाकळे यांनी केले.मी भाग्यवान दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना आपण त्या विद्यापीठाचे विद्यार्थी होतो. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आत्मियतेने हाताळले. विदयापिठाला त्यांनी वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग जुळून आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे भावोद्गार विजय भटकर यांनी काढले.
दादासाहेब ज्ञानाचे द्रष्टे
By admin | Updated: July 30, 2016 23:58 IST