अमरावती : महापालिकेत महिला नगरसेविकांच्या यजमानांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबंगगिरीने न होणारी कामे करावयास भाग पाडणे ही नित्याचीच बाब आहे. मात्र बुधवारी एका ‘पतिराज’ ने परिसीमा ओलांडत चक्क कार्यकारी अभियंत्यावर रुबाब जमविण्यासाठी घरी असलेल्या नगसेविका पत्नीला महापालिकेत बोलावले. या नगरसेविकेने सत्यता न बघता पतीची बाजू घेतली. अस्सल इंग्रजीत शब्दप्रयोग करुन आपण काहीतरी वेगळे आहोत, अशी ‘स्टाईल’ मारली. परंतु ‘पतीराज’ ला प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही, याची जाणीव करुन देण्याचे या नगरसेविकेने सौजन्य दाखविले नाही, हे विशेष.महापालिकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीकडून एकेरी भाषेचा शब्दप्रयोग करणे, हे काही नवीन नाही. परंतु कर्त्या अधिकाऱ्यांवर ठोस कारण नसताना चक्क शिविगाळ करेपर्यत पोहचणे हे संयुक्तिक नाही. लोकप्रतिनिधींना बरेच अधिकार आहेत. सभागृहात प्रस्ताव किंवा विषय मांडून एखाद्या प्रकरणाची माहिती मागून त्या अधिकाऱ्यांची कोंडी सहजतेने करता येते. मात्र महापालिकेत व्यक्तीगत हिताला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे अधिकारीवर्ग त्रस्त झाला आहे. विकासकामांच्या बाबत कानउघाडणी केली तर ऐकून घेण्यास हरकत नाही. मात्र नगरसेवकांचे वैयक्तिक ‘प्रश्न’ कसे सोडवावे, या समस्येने अधिकारी त्रस्त आहेत. अशाच विषयातूनच कार्यकारी अभियंता आणि नगरसेविका, पतिराज यांच्यात सभागृहात हजर न राहण्याच्या विषयावरुन वाद झाल्याची चर्चा महापालिकेत ऐकावयास मिळाली. या महिला नगरसेविकाच्या स्वभावाने बहुतांश अधिकारी त्रस्त आहेत. वर्षभरापूर्वी झोन कार्यालयातील सभेत ‘आय वॉन्ट टू रिझल्ट’ अशा वारंवार शब्दप्रयोगाने ही नगरसेविका चांगलीच चर्चेत आली होती. बुधवारी तर या नगरसेविकेने पतीच्या मदतीला धावून जाण्याच्या नांदात आपण स्वत: अडचणीत येणार असल्याचा विसर देखील त्यांना पडला. विनाकारण कार्यकारी अभियंत्याला ऐकेरी भाषेचा शब्दप्रयोग या नगरसेविकेने केल्याप्रकरणी ही बाब प्रशासकीय कार्यवाहीच्या कक्षात मोडणारी आहे, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे.महिला नगरसेविकांनी स्वत:ची प्रशासकीय कामे स्वत: हाताळावी असे काही महिन्यापूर्वी आयुक्तांनी पत्रवजा नियमावलीचे आदेश निर्गमित केले होते. असे असताना पतीराजच मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
महापालिकेत ‘पतिराज’ची दबंगगिरी
By admin | Updated: December 18, 2014 00:08 IST