संदीप मानकर अमरावतीरात्रीची ११ वाजताची वेळ, पंचवटी चौकात पेट्रोलिंगसाठी पोलिसांची एक व्हॅन येते. फुटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिला विक्रेत्याला गाडी काढण्याचा आदेश देऊन धमकावण्यात येते. महिलेचा मुलगा धावत पोलिसांच्या वाहनाजवळ जाऊन त्यांना कुल्फ्या नेऊन देतो आणि पोलीस पैसे न देताच कुल्फी खाऊन निघून जातात. हा प्रकार घडला सोमवारी रात्री दरम्यान ! एकीकडे महिलांचा सन्मान जपण्याचे सांगितले जाते. पोलिसही महिलांच्या सन्मानासाठी कटिबध्द असल्याचे सांगतात. मात्र, एका गरीब महिलेला पोलिसच अशा पध्दतीने धाकदपट करीत असतील तर इतरांचे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. रात्री १० वाजतानंतर रस्त्यावर व्यवसाय करण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवून असतात, हे काही गैर नाही. परंतु पदाचा व वर्दीचा धाक दाखवून नियमांच्या नावाखाली गोरगरिबांना विनाकारण मेटाकुटीस आणणे, पोलिसांना शोभते काय?, हा प्रश्नच आहे. पोलीस कर्मचारी लहान व्यापाऱ्यांना धाक दाखवून त्यांच्याकडे उपलब्ध वस्तू मोफत नेत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येते. पोटाची खळगी भरण्यासाठी गाडगेनगरातील महिला मुलाला सोबत घेऊन कुल्फी विक्रीचा व्यवसाय करते. उन्हाचा पारा वाढल्यामुळे रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी असते. परंतु उशिरा रात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवता येत नाही, सुरू ठेवलीच तर पोलिसांचा असा त्रास, त्यामुळे व्यावसायिक कंटाळले आहेत. नामुष्की : नियमांचे धडे देणाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन, भररस्त्यात पार्किंगअंबापेठ परिसरातील पानटपरीचालकाला अभय का?अंबापेठनजकीचा पानटपरीचालक उशिरा रात्रीपर्यंत व्यवसाय करतो.मद्यपींची येथे रात्री मोठी गर्दी असते. ही पानटपरी समोरून बंद दिसत असली तरी येथे आतून ग्राहकांना सेवा पुरविली जाते. या पानटपरीचालकाकडून जादा दराने गुटखा, पानमसाला, पान आदींची विक्री केली जाते. यामध्ये हजारो रुपयांचा व्यवसाय होतो. या पानटपरी चालकावर पोलीस कारवाई का करीत नाहीत?, त्याला अभय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस जर असे वागले असतील तर ते अतिशय दुर्देवी व चुकीचे आहे. रात्री पानटपऱ्या उशिरापर्यंत सुरू राहात असतील तर कारवाईचे निर्देश देण्यात येतील. याप्रकाराची चौकशी करण्यात येईल. - सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त, अमरावती
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांची दबंगगिरी, मोफत खातात कुल्फी
By admin | Updated: April 14, 2016 00:06 IST