चिखलदरा पर्यटन महोत्सवाचा समारोप : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चिखलदरा : चिखलदरा पर्यटन स्थळावर वर्षभर विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रहावी, यासाठी चिखलदरा सांस्कृतिक व विकास समितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिली. ते येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर जिल्हाधिकारी परदेशी, प्रकल्प अधिकारी षण्मुख राजन, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, पर्यटन मंडळाच्या क्षिप्रा बोरा, उपाध्यक्षा रेश्मा परवीन शे. मेहबूब, मुख्याधिकारी सुमेध अलोणे, प्रकल्प अधिकारी प्रवीण येवतीकर, नगरसेवक अरुण तायडे, भारत गणेशपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना जिल्हाधिकारी किरण गीत्ते म्हणाले, सिडकोमार्फत विदर्भाच्या या पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यासोबतच येथे वर्षभर पर्यटक यावेत, यासाठी हॉटेल ओनर्स असोसिएशनतर्फे तयार करण्यात आलेले कॅलेंडर उत्कृष्ट असून या सर्वांचा मेळ घालण्यासाठी चिखलदरा पर्यटन विकास समिती गठित करून सर्व साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नरनाळा ते गाविलगड किल्ला अशी सायकल रॅली आयोजित करण्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. चिखलदऱ्याची हवा बाहेर जाऊ द्या - भिलावेकरसिडकोमार्फत चिखलदरा पर्यटन स्थळाचा पाचशे कोटी रुपये खर्चून विकास होणार आहे. या पर्यटनस्थळावर आवश्यकता आहे ती पर्यटकांची. त्यामुळे समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी भारत गणेशपुरे यांचे ‘हवा येऊ द्या’ हे नाटक होत असले तरी चिखलदऱ्याच्या वैशिष्ट्याची हवा बाहेर जाऊ द्या, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रभुदास भिलावेकर म्हणाले. कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, नगरसेवक व स्थानीय सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संदीप सावरकर तर आभार मुख्याधिकारी सुमेश अलोणे यांनी मानले.
सांस्कृतिक-विकास समितीचे होणार गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 00:17 IST