ठेवीदार त्रस्त : प्रशासकाचे मात्र दुर्लक्ष वरूड : स्थानिक श्री नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. संचालक मंडळाच्या मते त्यांना मागण्याचा अधिकार नाही, प्रशासक म्हणतात वसुली झाल्यांनतर देतो. ठेवीदारांनी करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद काळे या ठेवीदाराने सहायक निबंधकाकडे तक्रार देऊनही ठेवी मिळाल्या नाहीत. यामुळे ठेवीदार त्रस्त झाले आहेत. पतसंस्थेत ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्याने खातेदारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. सहकाराचा स्वाहाकार करणाऱ्या संस्थांमुळे ठेवीदार, खातेदारांना मोठा फटका बसण्याची उदाहरणे वरुड तालुक्यात आहे. स्थानिक श्री नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरप्रकारसुध्दा चव्हाट्यावर आला आहे. संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. शेकडो ठेवीदारांचे लाखो रुपये या पतसंस्थेत आहेत. हितसंबंध जोपासणाऱ्या ठेवीदारांना किस्तीने ठेवी परत करणे सुरु असले तरी मात्र गरजू ठेवीदारांना रक्कम मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच मुलामुलींच्या लग्नाचे कार्यप्रसंग अडले आहे. पतसंस्थेच्या पायऱ्या झिजविणे सुरु असून काहींनी वकिलांमार्फत नोटीसही पाठविली. परंतु तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने हात वर करुन उलट आमची कारकीर्द संपली, असे सांगून वेळ मारुन नेत आहेत. असेच ठेवीदार शरद काळे रा. वरुड यांनी पतसंस्थेला आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस दिली असता हा प्रकार उघडकीस आला तर ‘नोटीस देऊन आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, असे स्पष्ट नोटीसमध्ये नमूद केले आहे. काळे परिवारातील ९ सदस्यांच्या नावे ४ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवी आहेत. वारंवार संस्थेत चकरा मारुनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालीन संचालक आणि त्यांच्या नातलगांकडे ७० लाख रुपये कर्जाऊ रक्कम थकीत असल्याचे सांगण्यात येते. ३ कोटी ७२ लाख रुपये ठेवी आणि तेवढे कर्ज असल्याने वसूल झालेली रक्कम व्याजासह ठेवीदारांना देण्यात येत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, एकेकाळी नावलौकिक मिळविलेल्या पतसंस्थेत सावळा गोंधळ झाल्याने ठेवीदार आणि खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. श्री नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या लाखोंच्या ठेवी अडकल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार बिघडले तर काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र तत्कालीन संचालकावर कोणतीही कारवाई झाली नसून प्रशासकाच्या भरवशावरच पतसंस्था सुरु असल्याचे सिद्ध होते. वसुलीनंतर ठेवीदारांना व्याजासह मिळणार रक्कमसहायक निबंधक तथा श्री नागरी पतसंस्थेचे प्रशासक उल्हे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तत्कालीन संचालक मंडळाचा कार्यकाळ संपृष्टात आल्याने निवडणूक कार्यक्रम लावण्यात आला होता. परंतु एकच नामनिर्देशन दाखल झाले होते. उर्वरित नामनिर्देशन आले नसल्याने प्रशासक नेमण्यात आला. यामुळे खातेदार तसेच ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ठेवीदारांनी ठेवी परत घेण्यासाठी गर्दी केली. परंतु ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या ठेवी आणि तेवढ्याच कर्जाची थकीत रक्कम असल्याने एकाचवेळी देणे शक्य होत नाही. मात्र प्रशासक कालावधीत मी अंदाजे २० लाखांपर्यंत ठेवी परत केल्यात. आतासुद्धा व्याजासह ठेवी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच काही तत्कालीन संचालक आणि त्यांचे नातेवाईकांकडे लाखो रुपये थकीत असून ते वसूल करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
नागरी पतसंस्थेत अडकल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी
By admin | Updated: June 13, 2015 00:26 IST