गुडेवारांची अनुपस्थिती : ठरावाकडे लक्ष अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा बदलीच्या पार्श्वभूमीवर सोमवार १६ मे रोजी होणाऱ्या आमसभेत रणकंदन होण्याची शक्यता आहे. गुडेवारांच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दलच्या ठरावावर साधक-बाधक चर्चा होईल. सोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात होईल. गुडेवार यांना संपूर्ण ३ वर्षांसाठी अमरावती महापालिका आयुक्त म्हणून कायम ठेवावे, हा विषय पहिल्या तासाभरातच चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. या ठरावावर शिक्कामोर्तब होत असताना भाजप-जनविकासविरुध्द बहुतांश नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी रंगण्याचे संकेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये बहुतांश नगरसेवकांनी गुडेवारांसंबंधी ठरावावर सहमती दर्शविली असून पहिल्या तासातच ठराव पारित होऊन राज्यशासनाकडे पाठविण्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि या ठरावावर भाजप, जनविकास काँग्रेस व अन्य काही नगरसेवकांकडून जोरदार आक्षेपही घेतला जाणार आहे.विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर याबद्दल वेळेवर निर्णय घेणार आहेत. गुडेवारांच्या बदलीच्या वृत्तानंतर शहरात लोकचळवळ उभी राहिली असताना भाजप-जनविकास काँग्रेस व अन्य काही नगरसेवक या मुद्यापासून लांब आहेत. भाजप गोटातून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता 'गुडेवारांची तीन वर्षे अमरावतीतच' या ठरावाच्या बाजूने ते उभे राहतील, ही शक्यता धुसरच आहे.८७ सदस्यीय महापालिकेत भाजपचे ७, जनविकास-जनकल्याण आघाडीकडे स्वत:च्या ७ शिवाय रिपाइं गटाचे २ असे ९, शिवसेनेकडे ११, काँग्रेस आघाडीत काँग्रेसच्या २५ नगरसेवकांसह एकूण ३१, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे २५ तर बसपाकडे ४ नगरसेवक आहेत. महापालिकेत अशाप्रकारे पक्षीय बलाबल असताना गुडेवारांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या ठरावाच्या बाजुने किती नगरसेवक उभे राहतात, याकडे समाज वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नगरसेवक वेळेवर कुठली भूमिका घेतात, यावरही बरेच अवलंबून आहे. सत्तापक्षाच्या नगरसेवकाचे ठिय्या आंदोलनअमरावती : शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या १५ मोठ्यानाल्यांच्या संरक्षणभिंतींच्या बांधकामाबाबत महापालिका उदासिन असल्याचा आरोप करीत नगरसेवक मिलिंद बांबल सोमवारच्या आमसभेत ठिय्या आंदोलन करणार आहेत. पन्नालालनगर येथील मोठ्या नाल्यासह १५ मोठ्या नाल्यांना संरक्षणभिंत नसल्याने नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी भारतीय महाविद्यालय, पन्नालालनगर ते हव्याप्र मंडळ या मोठ्या नाल्याला आलेल्या पुरामुळे काठावरील अनेक नागरिकांची घरे वाहून गेली होती. महापालिकेने १५ मुख्य नाले व १६ उपनाल्यांना संरक्षणभिंत बांधण्यासाठी ‘युनिटी कन्सलटंट कंपनी, पुणे’ द्वारे डीपीआर मागवला. मात्र, मनपा प्रशासनाचा पाठपुरावा योग्य प्रकारे नसल्याने या डीपीआरची किंमतही अव्वाच्या सव्वा झाली आहे, असा आरोप राकाँ फ्रंटचे नगरसेवक तथा माजी झोन सभापती मिलिंद बांबल यांनी केला आहे. पावसाळा तोंडावर असतानासुद्धा मनपा प्रशासनाला नाल्यांना संरक्षण भिंती बांधण्याचा मुहूर्त गवसलेला नाही. महापालिकेच्या या उदासिन भूमिकेचा निषेध करून १६ मे रोजी होणाऱ्या आमसभेत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती बांबल यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या आमसभेत रणकंदन?
By admin | Updated: May 15, 2016 23:58 IST