पान ३ चे लिड
असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : अलीकडे शहरातील काही निर्जन स्थळे गुन्हेगारीचे अड्डे बनू पाहत आहेत. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर प्रत्येक शहरातील निर्जन स्थळांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. त्या निर्जन स्थळांचा शोध घेऊन त्या ठिकाणी पोलिसांची गस्तदेखील सुरू झाली. त्यामुळे अनेक भुरटे व गुन्हेगारांनी आपले अड्डे बदलविले असून त्यांनी अलीकडे नवी व दूरवरची निर्जन स्थळे शोधून काढली आहेत.
शहरातील गुन्हेगारी आटोक्यात असली तरी अशा निर्जन स्थळांवर नव्याने गुन्हेगारीचा उदय होत असल्याने त्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे रात्रकालीन गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रात्री-अपरात्री निर्जनस्थळी बसून गांजा, दारू रिचवली जाते. अशा ठिकाणी पोलिसांचा नव्याने वॉच राहणार आहे. शहरातील काही निर्जन स्थळी गतकाळात बलात्काराच्या घटनादेखील घडल्या आहेत.
///////////
शहरातील महिला अत्याचाराच्या घटना
वर्ष : घटनांची संख्या
२०१८ : ७९
२०१९ : ८०
२०२० : ८१
२०२१ : ६९
//////////////
पोलिसांकडे संवेदनशील स्थळांची यादी
ज्या निर्जन स्थळांवर महिला अत्याचाराच्या घटना घडल्या, त्या ठिकाणांसह अन्य संवेदनशील स्थळांची यादी पोलिसांकडे आहे. त्या ठिकाणी रात्रकालीन पोलीस गस्तीसह दामिनी पथकाची दैनंदिन गस्त आहे. टवाळखोरांना हटकले जाते. मात्र, पोलिसांची नजर चुकविण्यासाठी काहींनी नवी निर्जन स्थळे शोधून काढली आहेत.
///////
येथे हवी पोलिसी गस्त, दामिनी पथकाची नजरही
टवाळखोर व गुन्हेगारांनी लक्ष्य केलेल्या अनेक जागांवर पोलीस गस्त घालत असतात. मात्र, कोंडेश्वर मंदिरापुढील जंगलाकडे जाणारा परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनू पाहत आहे. तेथे रात्रकालीन गस्तीसह दामिनी पथकाचा वॉच आवश्यक आहे.
००००००००००००
ही ठिकाणे धोक्याचीच
कोंडेश्वर जंगल
कोंडेश्वर मंदिराच्या पुढ्यात मोठे जंगलव्याप्त क्षेत्र आहे. अनेक प्रेमीयुगुल तेथे प्रेमालापासाठी जात असतात. काही तरुण, तरुणींना तेथे लुटण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. मात्र, बदनामीपोटी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही.
//////////
अकोली रेल्वे स्थानक परिसर
अकोली रेल्वे स्थानक परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतो. त्या भागाला लागून जंगलक्षेत्रदेखील आहे. त्या भागातील विशिष्ट क्षेत्रात गांजा, दारू पिणाऱ्यांचा मोठा वावर असतो. अलीकडेच तेथे ‘डान्सिंग कार’चा प्रकार उघड झाला होता.
////////////
अंबिकानगर शाळेचे मैदान
अंबिकानगर महापालिका शाळेला मोठे क्रीडांगण लाभले आहे. ती शाळा जीर्णावस्थेत पोहोचली आहे. त्या शाळा परिसरात रात्री-अपरात्री गर्दुल्यांचा राबता असतो. दोन वर्षांपूर्वी तेथे एका दारूच्या वादातून एका तरुणाचा खूनदेखील झाला होता.
/////////////
मिळालेल्या निधीचे काय केले?
निधीबाबत ग्रामीण वा पोलीस यंत्रणेकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. त्या-त्या पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांच्या काळात त्या निधीमधून कामे झाल्याची माहिती आहे. मात्र, त्याबाबतचा दस्तावेज पोलीस दप्तरी नाही. मात्र, शहरात महापालिकेच्या माध्यमातून विशिष्ट निर्जन स्थळी पडक्या इमारतींची डागडुजी करण्यात आली, तर अनेक ठिकाणी पोलिसांची नियमित गस्त आहे.
////////
रात्रकालीन गस्त प्रभावी
निर्जन स्थळांबरोबरच संपूर्ण शहर आयुक्तालय क्षेत्रात रात्रकालीन गस्त घातली जाते. दामिनी पथक, बीट मार्शल व त्या-त्या पोलीस ठाण्याची पथके दिवसभर गस्तीवर असतातच. महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे.
- डाॅ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती