एसडीपीओ जितेंद्र जाधव, आपत्ती व्यवस्थापन समिती सतर्क
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या काळात रात्रीला जमावबंदीचा कायदा लागू होत असताना रंगपंचमीच्या दिवशी रस्त्यावर येऊन रंग उधळल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत फौजदारी कारवाईचे निर्देश चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी दिले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान, रविवारी होळी, तर सोमवारी रंगपंचमी हा उत्सव येत आहे. या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. चौकात एकत्र येऊन होळी पेटवू नये, होळी पेटवताना वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकत्र येणे व गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, अशा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच मिरवणुकांचे आयोजन करू नये, डीजे वाजवून नृत्य करण्यावर बंदी असल्याचे चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी सांगितले.
या कायद्यानुसार कारवाई
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली आणि विरोध दर्शविला तर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८ ९ ७ व भारतीय दंडसंहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले.
बाजारात निरूरुत्साह
होळी आणि रंगपंचमीच्या अनुषंगाने बाजारात उत्साह नाही. कोरोना संसर्ग वाढत असताना रगपंचमीदरम्यान लोक एकत्र येत असल्याने संसर्गाची अधिक भीती आहे. त्यामुळे रंग, पिचकार्यांचा बाजार थंड आहे. लोक केवळ लहानग्यांची पिचकारीची हौस भागवत असल्याचे चित्र आहे. एकंदरितच बाजारात निरुत्साह पहायला मिळत आहे.