वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्याची सोय, वन्यप्राण्यांना मोठा दिलासा
पोहरा बंदी : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोडी वर्तुळात वनखंड क्रमांक ३१० मध्ये एक कृत्रिम पाणवठा नुकताच निर्माण करण्यात आला आहे. या जंगलामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असून, उन्हाळ्याचे संकेत लागताच पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलाबाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरावती शहराच्या पाचशे क्वार्टरपासून चांदूर रेल्वे शहरापर्यंत वनविभागाचे राखीव जंगल आहे. या वनपरिघात बिबट, रोही, चितळ, हरिण, काळवीट, रानडुक्कर, ससे, कोल्हे, रानकुत्रे, रानमांजर, मोर, लांडगे, मसन्याऊद, माकड यांसारखे विविध वन्यप्राणी विपुल प्रमाणात आहेत. त्या तुलनेत वन्यप्राण्यांना तृष्णा भागविण्यासाठी वनक्षेत्रात पाणवठे तोकडे पडत असल्याचे पाहून वन्यप्राण्यांना मुबलक पाणीसाठा मिळावा, यासाठी एका कृत्रिम पाणवठ्याची भर टाकण्यात आली आहे. त्या पाणवठ्यामध्ये मुबलक पाणीसाठा होत असल्याने वन्यप्राण्यांसाठी तो पाणवठा लाभदायी ठरला असून, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, स्वप्निल सोनवणे यांच्या चमूसह वनरक्षक राजन हिवराळे, गोविंद पवार, अश्विन महल्ले, राहुल कैकाळे, दीपा बेलाह, अतुल धस्कट, वनमजूर शालिक पवार यांनी जागेची पाहणी करून वन्यप्राण्यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी एक कृत्रिम पाणवठा तयार केला. त्या पाणवठ्यामध्ये नियमित पाणीसाठा उपलब्ध होत असल्याने वन्यप्राण्यांची तृष्णा भागविली जाते.