पालकमंत्री पोटे : २२ वी विदर्भ पर्यावरण परिषदेचा समारोपअमरावती : जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संपूर्ण जगभरात पर्यावरण आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. जगण्याची श्वाश्वता व सामूहिकता धोक्यात येत आहे. या धोक्यापासून भूतलावरील सजिवांना वाचविण्यासाठी तरूणांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृकता आणावी, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित २२ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत ते बोलत होते.यावेळी महापौर रिना नंदा, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वि.दा. पवार, कविता पवार, प्रयासचे संचालक अविनाश सावजी, प्रकाशचंद लढ्ढा, पाटील, काळकर, श्रीकांत देशपांडे, अस्मिता शिक्षण मंडळाचे प्राचार्य मु.अ. भोंडे, कमल भोंडे, नगरसेवक प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते.पर्यावरणाला अपायकारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या घराच्या आवारात तसेच परिसरात मोठया प्रमाणात प्राणवायू देणारी पिंपळ, वड, निम अशी वृक्षे लावावीत जी येणाऱ्या पीढीला प्राणवायू पुरवेल,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पर्यावरण विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त रजनी आमले यांनी पर्यावरणपुरक सण कसे साजरे करावेत? यासंबंधी मार्गदर्शन केले. हेमंत जुमडे, वि.दा.पवार यांनीसुध्दा पर्यावरणाच्या संवर्धनाबाबतचे महत्त्व व परिषदेच्या आयोजनामागील उद्देश समजावून सांगितला. कार्यक्रमास पर्यावरण विषयातीलतज्ज्ञ व्यक्ती, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद, निसर्गस्नेही, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:13 IST