नियमांचे उल्लंघन : सिटी बसेस, आॅटोरिक्षामध्ये क्षमताबाह्य वाहतूक अमरावती : शहरात शहर बसेस व आॅटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. आरटीओसह वाहतूक शाखेचे पोलिसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘सीपी साहेब, यांना जरा आवरा’ असा सूर सामान्य नागरिकांमधून उमटत आहेत. शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा धावतात तर एकूण २३ शहर बसेस विविध मार्गांवर प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. शहराच्या लोकसंख्येसोबतच वाहनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील बहुतांश भागात सतत वर्दळ सुरुच असते. यामध्ये मुख्य मार्गावर वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रवासी आॅटोरिक्षा व शहर बसेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू असते. ही बाब प्रवाशांसाठी प्राणघातक सिध्द होऊ शकते. वास्तविक आॅटोरिक्षामधून केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, या नियमांच्या चिंधड्या उडवून आॅटारिक्षाचालक पाच-पाच आणि वेळ पडल्यास सात-सात प्रवाशांची वाहतूक करताना दृष्टीस पडतात. प्रवासी दिसताच रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी आॅटोरिक्षाचालक थांबतात. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यातून एखादा भयंकर अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आॅटोरिक्षा अचानक प्रवासी घेण्यासाठी थांबल्यास मागून येणाऱ्या वाहनांना खोळंबून राहावे लागते. मग, सगळीच ताटकळणारी वाहने कर्णकर्कश्श हॉर्न वाजवतात. तरीही आॅटोरिक्षाचालक प्रवासी घेतल्याशिवाय वाहन पुढे दामटत नाहीत. विशेष म्हणजे हा सगळा प्रवास वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आवश्यक असलेला गणवेश आणि बॅच क्रमांकसुध्दा बहुतांश आॅटोरिक्षा चालकांकडे दिसून येत नाही. मात्र, तरीही आॅटोरिक्षाचालकांवर थातूर-मातूर कारवाई केली जात असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असा संशय घेण्यास वाव आहे. हिच गत शहर बसेसची आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरातील मुख्य चौकांमध्ये थांबून या बसेस प्रवासी घेतात. त्यामुळे मागून येणारी वाहतूक खोळंबते. शहरातील कोणत्याही मार्गावरून ओव्हरफ्लो शहर बसेस आपल्या दृष्टीस पडतात. बसस्थानक चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक आदी ठिकाणी आॅटारिक्षा व शहर बसेसचा मनमानी कारभार उघड-उघड सुरू आहे. आॅटोरिक्षा पार्किंग नसल्यामुळे झुंबडशहरात आॅटोरिक्षा पार्किंगची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश आॅटोरिक्षा चालक एकाच ठिकाणी गर्दी करून असतात. राजकमल चौक, बसस्थानक, राजापेठ येथील चौकात आॅटोरिक्षाची गर्दी अधिक असते. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. वायू प्रदूषण वाढले शहरात पाच हजारांवर आॅटोरिक्षा असून ग्रामीण भागातील आॅटोरिक्षा सुध्दा शहरात येत आहेत. त्यातच अनेक कालबाह्य आॅटोरिक्षा सर्रास रस्त्यावर धावत आहे.रॉकेलचा वापरही होत असल्याने शहरात प्रदूषण वाढले आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सीपी साहेब, यांना जरा आवरा !
By admin | Updated: February 4, 2016 00:18 IST