अनिल कडू
परतवाडा : कोरोना संक्रमित नसतानाही परतवाडा शहरातील ८ वर्षीय मुलाला स्थानिक यंत्रणेने चक्क कोविड रुग्णालयात उपचारार्थ पाठविल्याची घटना येथे उघडकीस आली आहे.
स्थानिक ब्राह्मणसभा निवासी आठ वर्षीय मुलावर, त्याच्या पालकांवर हा प्रसंग ओढवला आहे. तो मुलगा तापाने आजारी होता. त्याच्यावर परतवाडा शहरातील एका खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. दरम्यान तापात चढ-उतार होत असल्याने संबंधित बालरोगतज्ज्ञांनी त्याची कोविड टेस्ट करवून घेण्याचे पालकांना सूचित केले.
त्यानुसार २२ फेब्रुवारीला आरटीपीसीआरकरिता त्या मुलाचा स्वॅब घेण्यात आला. लागलीच दुसऱ्या दिवशी स्थानिक यंत्रणेने मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत २३ फेब्रुवारीलाच त्याला कोविड रुग्णालयात हलविण्याचा आग्रह धरला. एका खाजगी वाहनाने पालकांनी त्या मुलाला सोबत घेत २३ फेब्रुवारीलाच रात्रीला अमरावती गाठले. अनेक कोविड रुग्णालयांशी त्यांनी संपर्क साधला. नॉन कोविड रुग्णालयातही दाखविण्याचा प्रयत्न केला; पण कुठेही संदर्भसेवा मिळू शकली नाही.
अखेर २४ फेब्रुवारीला मोर्शी रोडवरील एका कोविड रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले. औषधोपचारही सुरू केले गेले. दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोविड- १९ प्रयोगशाळेने तो मुलगा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला. सध्या त्या मुलावर अमरावती येथील एका नॉन कोविड रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. कोरोना संक्रमित नसतानाही कोविडच्या उपचारार्थ पाठविणाऱ्या त्या स्थानिक यंत्रणेविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. पालकांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे.