अनिल कडू
परतवाडा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या अनुषंगाने कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोज राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडेच लस उपलब्ध नसल्याने मागणी नोंदवूनही लसीची खेप जिल्ह्याला मिळाली नाही. रविवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी लसीचा एकही डोज शिल्लक नाही.
विचोरी, विश्रोळी, येसुर्णा, शेंदूरजनाघाट, सेमाडोह, कळमखार, कुऱ्हा, हरिसाल, लोणी टाकळी, माहुली जहागीर, निंबोली, नेरपिंगळाई, मार्डी, मोर्शी, सातरगाव, पापड, साद्राबाडी, शिरजगाव, सलोना, तळवेल, चिखलदरा, आमला, आष्टी, ब्राम्हणवाडा थडी, बैरागड, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, बेनोडा, गणोरी, खेड, कळमखार या केंद्रांवरील लसीकरण बंद पडले आहे. त्यांसह अचलपूर परतवाड्यातील लसीकरणही बंद पडले.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रात परतवाड्यातील सुतिकागृहात व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुतिकागृहात दररोज सरासरी १५०, तर उपजिल्हा रुग्णालयात २५० लोकांना लस दिली जाते. लस संपल्यामुळे या दोन्ही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहेत. तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे ८० आणि पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रात १६० डोज शिल्लक आहेत. हे शिल्लक डोज लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत.
१४ एप्रिलला येतील का डोज?
कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्य शासनात चांगलीच जुंपली आहे. मागणीप्रमाणे लस उपलब्ध न झाल्याने राज्यस्तरावर दोन्ही लसी उपलब्ध नाही. दरम्यान, अमरावती जिल्ह्यासाठी ४.५० लाख डोजची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. तो साठा १४ एप्रिल रोजी जिल्ह्याला उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत असल्याने खरोखर लस १४ रोजी उपलब्ध होईल का, यावर तालुका आरोग्य यंत्रणा साशंक आहे.