चांदूर बाजार : स्थानिक नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थींच्या विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी १५ मार्चपासून नगर परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन उभारले होते. भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या मध्यस्थीने ते सोडण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अर्जुन वांदे, ठाणेदार सुनील किनगे, मुख्याधिकारी पराग वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे उपस्थितीत होते.
घरकुल लाभार्थींना उर्वरित अनुदान केंद्र शासनाकडून त्वरित मंजूर करण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी संसदेमधे मुद्दा उपस्थित केल्याने केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी निधी उपलब्ध केला. त्यानंतर ४ मार्च २०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसार सदर निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे खासदार रामदास तडस यांचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी आंदोलनकर्ते गोपाल तिरमारे व पालिका प्रशासनाला दिले. मुख्याधिकारी यांनी शहरामध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यासोबतच नवीन लाभार्थींचा दुसरा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याकरिता प्रकल्प सल्लागार समितीकडे पाठविलेली लाभार्थींची यादी मुख्याधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्याने तिरमारे यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता झाली. यावेळी नगरसेवक विजय विलेकर, अतुल रघुवंशी, टिकू अहिर तसेच महादेवराव काकडे, रावसाहेब घुलक्षे, सुरेश खडसे, आशिष कोरडे, नीलेश देशमुख, गजानन राऊत, सुमीत निंभोरकर, वैभव सिनकर, विजय मोहोड, सुरेश वानखडे उपस्थित होते.
------------