दोन्ही फोटो घ्यावेत.
शेकडो कोंबड्या-बकऱ्यांचा जीव वाचला: आदिवासींचा नवस अपूर्ण
चिखलदरा : कोरोनामुळे देशभरातील सर्वच यात्रा, महोत्सव आदींवर बंदी घालण्यात आली आहे. मेळघाटातील आदिवासींचा सर्वांत मोठा पाच दिवस चालणारा होळी उत्सव त्याला अपवाद ठरला नाही. हजारो आदिवासींच्या उपस्थितीत होणारी मेघनाद यात्रा मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पूजाअर्चा करून झाली.
होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच, होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाद यात्रा भरायला सुरुवात होते. तालुक्यातील बड्या गावांमध्ये जेथे आठवडी बाजार भरतो, त्या गावात ही यात्रा भरते. काटकुंभ, जारिदा येथे अत्यंत साध्या पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करीत व यात्रा रद्द असल्याने भूमकाने नित्य पूजापाठ करीत परंपरा व संस्कृती कायम ठेवली. रावणपुत्र 'मेघनाद’च्या नावाने मेळघाटात आजही वंशपरंपरागत यात्रा भरते. जारिदा व काटकुंभ येथे परिसरासह मध्य प्रदेशातील ५० ते ६० गावांतील हजारोंच्या संख्येने आदिवासी व गैरआदिवासी तेथे हजेरी लावतात. यंदा मात्र कोरोनामुळे मेळघाटच्या इतिहासात पहिल्यांदा ही यात्रादेखील रद्द करण्यात आली.
बॉक्स
नवसाची फेड अपूर्ण
मेळघाटातील आदिवासींची देवी-देवतांवर अमाप श्रद्धा आहे. घरातील लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आजारी पडल्यास मोठ्या प्रमाणात नवस कबूल केले जातात. मेघनाद यात्रेत हा नवस फेडण्याची प्रथा आहे. यंदा मात्र हे नवस अपूर्ण राहिले. नवस पूर्ण झाला की, मेघनादवर चढून आडव्या खांबाला नवस कबूल केलेल्या व्यक्तीला आडवे बांधले जाते. खाली दोन इसम त्या दोरीच्या साह्याने सहा प्रदक्षिणा देतात. तीन-तीन वेळा विरुद्ध दिशेने या प्रदक्षिणा दिल्या जातात. तेव्हाच नवसफेड झाली, असा समज आहे. यंदा मात्र काटकुंभ येथील ल भुमका सुबाजी बेठेकर व तीन-चार सहकाऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करीत अगदी साध्या पद्धतीने पूजापाठ करून प्रदक्षिणा केली.
बॉक्स
विड्यात लग्न, ढोल ताशे, नगाऱ्यांना मुकले
ढोल, नगारे, डफळी, ताशे ही वाद्ये वाजवित गादोली नृत्य यात्रेची शोभा वाढवते. बगदरी, काजलडोह, कोटमी, कोयलारी, पलासपानी येथील चमू आकर्षक ठरतात. युवक-युवती एकमेकाला पसंती दर्शवित मीठा पान देतात. त्यानंतर आई-वडील मुलीला शोधून गोनम (पंचासमक्ष बसून हुंडा) ठरवितात. काही रकमेतून जिलू-सिडू ( मटण, मोहा दारू) जेवण दिले जाते. मात्र, यंदा या पारंपरिक पद्धतीला कोरोनामुळे खीळ बसली.
----