दिन विशेष (लोगो) इंदल चव्हाण
अमरावती : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने मुले पूर्णवेळ घरात राहत आहेत. पालक ज्या पद्धतीने वागतात, त्याचे अनुकरण मुले करतात. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी, संस्कार देण्याची ही उत्तम संधी कोरोनाने बहाल केल्याचा सदुपयोग घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पालकदिनानिमित्त पालकांना केले आहे.
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे हे शेतकरीपुत्र. दर्यापूर तालुक्यातील बेंबळा येथे त्यांची वडिलोपार्जित कोरडवाहू शेती आहे. आजही त्यांचे वडील शेती व्यवसाय करतात. त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्न घेतले. चारही मुला-मुलींना त्यांनी उच्च शिक्षण देऊन नोकरीला लावले. त्यांची सततची तळमळ मुलांना शैक्षणिक जीवनात प्रेरणादायी ठरली. सध्या वृद्धावस्थेतही ते उत्तमरीत्या शेतीतून उत्पादन घेत असल्याचे आयुक्त रोडे म्हणाले. त्यामुळे मुलांच्या जीवनात पालकांची फार मोठी भूमिका असते. आम्ही तिघे भाऊ आणि एक बहीण सर्व उच्च पदावर नोकरी करीत आहोत, ही माझ्या वडिलांचीच कृपा असल्याचे आयुक्त रोडे म्हणाले. सध्या कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंदच असल्याने मुले पूर्णवेळ घरीच राहत असून, आपले वडील दैनंदिन कार्य कशा पद्धतीने पार पाडतात? सोशल मीडियाचा वापर करताना पालकांची भूमिका कशी असावी, याचे अनुकरण मुले करतात. त्यामुळे चांगले संस्कार देण्यासाठी, बौद्धिकक्षमता वाढीसाठी, योग्य वळण लावण्यासाठी ही वेळ कोरोनामुळे चालून आलेली आहे. याचे महत्त्व मुलांना पटवून त्यांच्याकडून योग्य कामे करवून घेतल्यास शिस्त आणि कर्मगतीची सवय मुलांना जडणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाला आजच्या पालक दिवसानिमित्त हा संदेश आयुक्त रोडे यांनी दिला आहे.