धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायत कार्यालयात ऑनलाईन माहिती अपलोड करणारे संगणक परिचालक तसेच गावातील स्वच्छतेपासून तर घर व पाणीपट्टी कर वसूल करून सर्वांगीण बाबीकडे लक्ष देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लस दिलीच नसल्याने हे कोरोनायोद्धे लसीपासून वंचित आहेत.
राज्याच्या ग्रामविकास खात्याने ८ जुलै रोजी पत्र काढून या दोन्ही कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा घोषित केले. ३० सप्टेंबर २०२० रोजी त्यांना ५० लाखांचा विमा कवच देण्याचे आदेश ग्रामविकास खात्याचे उपसचिव प्रवीण जैन यांनी काढले. मात्र, या आदेशाला तालुका प्रशासनाने यापूर्वी केराची टोपली दाखविली. आता आरोग्य, महसूल, पंचायत समिती कर्मचारी, आशा सेविका, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना लसीचा दुसरा डोज दिला जात असताना, तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांच्या नावाची यादीच लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोट
कोरानाकाळातही ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ठाम मांडून आहोत. ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी असते. आम्हाला कोरोनायोद्धा घोषित करण्यात आले. पण, लसीपासून वंचित ठेवले आहे.
- विशाल रोकडे, तालुका संघटक, संगणक परिचालक संघटना
कोट
गावातील प्रत्येक गल्लीबोळात फिरून आम्ही ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतो तसेच ग्रामपंचायतीची कामे सांभाळत आहोत. मात्र, अद्यापही आम्हाला लस दिली नाही. कोरोनाकाळात तरी आमच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.
- अमोल कांबळे, तालुकाध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, धामणगाव रेल्वे
कोट
तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांच्या नावाची यादी पाठविण्याचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले. ही यादी जिल्हा आरोग्य विभागापर्यंत का पोहोचली नाही, याची चौकशी केली जाईल.
- माया वानखडे, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे
-------