अमरावती : कोरोना लसीकरणात सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. ही मोहीमच आता जिल्ह्यातील २७ केंद्रांवर राबविण्यात येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या माता-पित्यांचे व कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी केले.
जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनीही मोहीम हाती घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्याांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घेण्याचा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. लसीकरणाच्या चालू टप्प्यात ९० वर्षांवरील सर्व आणि सहव्याधी असणाऱ्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही लस घ्यायची असल्यास दोन वेगवेगळ्या लसीत कमीत कमी १४ दिवसाचे अंतर असावे. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा एकाच प्रकारच्या घेणे आवश्यक आहे. पहिली मात्रा एका कंपनीची आणि दुसरी मात्रा दुसऱ्या कंपनीची घेऊ नये. उदाहरणार्थ, पहिली मात्रा जर कोव्हॅक्सिन घेतली असेल, तर दुसरी मात्रा कोविशील्ड घेता येत नाही, असे मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती दुरुस्त झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनंतर लसीकरण करू शकतो. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत व ज्या रुग्णांना प्लाझ्मा दिला आहे किंवा कोणत्याही इतर आजाराने ग्रस्त रुग्ण रुग्णालयात भरती असून त्याला आय.सी.यू ची गरज असेल किंवा नसेल त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी लसीकरण करता येते, असे सीएस श्यामसुंदर निकम यांनी स्पष्ट केले.
बॉक्स
या व्यक्तींनी घेऊ नये लस
ज्या व्यक्तीला कोविड-१९ च्या मात्रेची गंभीर ॲलर्जीक रिॲक्शन आली असेल, लस दिल्यानंतर लगेच किंवा उशिरा अतिगंभीर ॲनफालाक्सिक किंवा ॲलर्जीक रिॲक्शन आली असेल किंवा लस, इंजेक्शन, औषधे किंवा अन्नपदार्थामुळे रिॲक्शन येत असेल अशा व्यक्तींनी लस घेऊ नये. गर्भवती व स्तनदा माता यांना लस देऊ नये. या गटात ट्रायल झालेली नाही, असे सीएस यांनी सांगितले.
बॉक्स
लसीकरणात ही घ्यावी विशेष खबरदारी
ज्या व्यक्तींना रक्तस्त्रावाचा किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया होत असेल त्यांनी खबरदारी घेऊन लस घ्यावी. जे व्यक्ती कोरोना उपचारानंतर ते बरे झाले. मुदतीचे (क्रॉनिक) आजार किंवा इतर संलग्न आजार आहे. त्यांनी लस घेण्यास हरकत नाही. इम्युनो-डिफीशिएन्सी, एचआयव्ही आणि जे रुग्ण इम्युनो सप्रेशन उपचारावर आहेत, अशा व्यक्तींना लस देण्यास हरकत नसल्याचे सीएस म्हणाले.