पहिला टप्पा : बेलोरा, वणी, खरपी, राजणा-पूर्णा ग्राम पंचायतींचा समावेश
चांदूर बाजार : तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणाला गती देण्यात आली आहे. यासाठी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातील या लसीकरण कार्यक्रमांतर्गत, पहिल्या टप्प्यात बेलोरा, वणी, करपी, राजणा-पूर्णा या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या सर्व ग्रामपंचायतींमध्ये लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तालुक्यात फेब्रुवारीपासून लसीकरण करण्यात येत आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यात स्थानिक ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात तळवेल, ब्राम्हणवाडा थडी, आसेगाव, करजगाव, शिरजगाव कसबा या केंद्रांचा समावेश आहे. या सर्व लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी नागरिकांना वाहतुकीचीही व्यवस्था नव्हती. नागरिकांची ही गैरसोय टाळून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तालुक्यात ग्रामपंचायत पातळीवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीवरील वणी (बेलखेड) येथे लसीकरण कार्यक्रम शुभारंभप्रसंगी, सरपंच आरती राऊत, उपसरपंच अशोक अलोणे, मंगेश देशमुख, प्रफुल्ल नवघरे, डॉ. नीलेश खोंड, डॉ. वैशाली निस्ताने, डॉ. अक्षय काटोलकर, नीलिमा बनसोड, भाग्यश्री मानकर, प्रियंका धस्कट, लता चव्हाण, सुरेश त-हेकर उपस्थित होते.
कोट
तालुक्यात ४,३२६ नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण सुरू झाल्यामुळे कोरोना लसीकरणाला तालुक्यात वेग वाढणार आहे. परिणामी कोरोना प्रादुर्भावाची व्याप्ती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ज्योत्सना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार