फोटो - पी ०९ तिवसा
तिवसा : कोरोनाच्या लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात व्हायला वेळ असला तरी ठिकठिकाणी शुक्रवारी ‘ड्राय रन’अर्थात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ही रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली. त्यादरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी भेट देत तिवसा ग्रामीण रुग्णालयातील या रंगीत तालमीचे कौतुक केले. यात रुग्णालयातील २७ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
कोरोना लस उपलब्ध जरी झाली नसली तरी ती कशाप्रकारे देण्यात येणार आहे. त्याची ही रंगीत तालीम होती. ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होती. ज्या ठिकाणी ही लसीकरण मोहीम ठेवण्यात आली होती, त्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, थर्मल स्क्रीनिंग, नोंदणी आदी व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी नियोजित वेळेत संबंधित विभागाच्या नोंदणीकृत रुग्णांची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. याप्रसंगी रुग्णालयातील डॉ. गौरव विधळे, डॉ. अंकुश नवले, डॉ. रोहित देशमुख व सर्व कर्मचारीवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम यांनी रुग्णालयाला भेट दिली.