अमरावती/ संदीप मानकर
देशात आलेली कोरोनाची लाट व नियंत्रणार्थ शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण धोटे महाराज यांचे समाजासाठी सुरू असलेले जनजागृतीचे कामही यामुळे काही महिने बंद होते. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी रडत बसल्यापेक्षा जिद्द व चिकाटीने मास्क तयार करून विक्री सुरू केली. कोरोनावरील लस आल्यामुळे मास्कला विशेष मागणी नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ला बदलून, कोरोनालाच संधी समजून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला. त्यांचे हे कार्य कुटुंबीयांसाठी तसेच इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.
गाडगेनगर येथे राहणाऱ्या धोेटे महाराज हे मुळचे दर्यापूर तालुक्यातील शिरसदा येथील आहेत. ते पूर्वी शिवणकाम करायचे. परंतु त्यांना समाजसेवीची आवड असल्याने सन २०१४ पासून ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतले. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन ते कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलनसंदर्भात कार्यशाळा घेऊन पोलिसांना मार्गदर्शन करायचे. गत सहा वर्षांत त्यांनी या उपक्रमांतर्गत दुचाकीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यशाळा झाल्यानंतर पोलिसांनी गोळा केलेल्या वर्गणीतून त्यांना प्रत्येक कार्यशाळेचे ७०० ते हजार रुपये मिळायचे. यावरच त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. हे सुरु असताना अचानक शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हा ते सातारा जिल्ह्यात जगजागृतीकरिता गेले होते. त्यानंतर दुचाकीने ते अमरावतीत परतले. काही दिवस काय करावे हे सूचत नव्हते. तेव्हा त्यांनी फारशी चिंता न करता चिंतन केले. पुर्वीचा अवगत असलेला शिवणकामाचा गुण त्यांनी कामी लावला. सोशल मीडियावर बघून त्यांनी मास्क तयार केले. मास्कची वाढती मागणी लक्षात घेता चांगल्या दर्जाच्या व रंगबिरंगी मास्क तयार करून त्यांनी गाडेनगर भागातील रस्त्यावर २० ते ३० रुपयांत विक्री केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चार महिलांना मास्क तयार करण्यासाठी सोबतीला घेतले व त्यांनाही काही महिने रोजगार उपलब्ध करून दिला. सहा ते आठ महिने या व्यवसायातून उदरनिर्वाह चालविला. दोन महिन्यांपासून मास्कला फारशी मागणी नसल्यामुळे त्यांनी मास्क विक्रीच्या व्यवसायासोबत त्याला जोडधंदा म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला. या व्यवसायात त्यांना त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा साथ देत आहेत. कोरोनानेच त्यांचा व्यवसाय हिरवला व कोरोनानेच त्यांना व्यवसाय दिला. त्यांचे हे कार्य त्यांच्या परिवारासाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
कोट
मला अंधश्रद्धा निमुर्लन जनजागृतीचे काम करायची आवड आहे. माझ्या कार्यशाळा सुरु झाल्या की मी ते कार्य करणार आहे. लाॅकडाऊनमध्ये मास्क विक्रीच्या व्यवसायाने माझ्या परिवाराला जीवंत ठेवले.
श्रीकृष्ण धोेटे महाराज गाडगेनगर