जल्लोष : मधुकर तराळ अध्यक्षदर्यापूर : शेतकऱ्यांच्या हिताची असलेली व एकेकाळी असलेली राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी मधुकर तराळ यांची दुसऱ्यांदा निवड झाली, तर उपाध्यक्षपदी गजानन जाधव, मानद सचिव म्हणून बाळासाहेब टोळे, मानद सहसचिव संगीता कोकाटे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.मधुकर तराळ यापूर्वीचे विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुन्हा पॅनेल श्रेष्ठींनी त्यांच्या नावाची वर्णी लावली. उपाध्यक्षपदी लासूर येथील गजानन जाधव यांना संधी दिली आहे. बाळासाहेब टोळे यांच्या गळ्यात सचिवपदाची माळ पडली आहे. ते शिवसेनेच्या गोटातील असल्याने अध्यक्ष व सचिव होण्याचा मान शिवसेनेच्या गोटातील संचालकांना मिळाला. जिल्हा बँकेचे संचालक व काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर, सहकारनेते बापुसाहेब कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलने १० जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. तर आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या शेतकरी पॅनेलला चार जागा व बाळासाहेब वानखडे यांच्या समता पॅनेलला तीन जागा मिळाल्या होत्या. अध्यक्षपदी मधुकर तराळ यांची निवड होताच सुधाकर भारसाकळे, बापुसाहेब कोरपे, बाळासाहेब हिंगणीकर, अनंतराव टाले यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी विजयाचा जल्लोष करण्यात आला. निवडणुुकीचे कामकाज खरेदीविक्री संघाच्या दालनात दुपारी २ वाजता सुरू झाले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय.एस. तरटे, के.एस. बलिंगे यांनी पाहिले. (प्रतिनिधी)
दर्यापूर खरेदी-विक्री संघावर सहकार पॅनेलचा झेंडा
By admin | Updated: September 16, 2015 00:11 IST