वरूड : तालुक्यात हातुर्णा ते जरूड, गव्हाणकुंड, टेम्भूरखेडा असा चक्राकार सिमेंट आणि डांबरी रस्ता तयार करणे सुरू होते. कोट्यवधींचा खर्च सुरू आहे. परंतु, या रस्त्याच्या कंत्राटदाराने रस्ता अपूर्ण सोडून पळ काढला. यामुळे टेंभूरखेडावासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष नियुक्त अभियंत्यांकडे असून, त्यांचेही दुर्लक्ष आहे.
वरूड तालुक्यातील अंतर्गत वाहतूक सोयीची व्हावी म्हणून शासनाने हातुर्णा ते जरूड, बहादा, गव्हाणकुंड, टेंभूरखेडा ते वरूड राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा चक्राकार मार्ग तयार करण्यात आला. मात्र, ठेकेदाराने ठिकठिकाणी निकृष्ट काम झाले, तर कुठे अपूर्ण आहे. परंतु, यावर देखरेख ठेवणारा सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त असून, लक्ष ठेवून निरीक्षणे नोंदविण्याकरिता विशेष अभियंत्याची नियुक्ती केली आहे. परंतु, हे अधिकारी असतात तरी कुठे, अशी चर्चा नागरिकांत आहे. वरूड ते टेंभूरखेडा ते गव्हाणकुंड या मार्गाचे कुठे डांबरीकरण, तर कुठे सिमेंट रस्ता असा विकास सुरू आहे. टेंभूरखेडा गावच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेसमोर एक बाजू बांधली आणि दुसरी बाजू अडगळीत पडलेली आहे. यामुळे अनेक अपघात घडले. चार-पाच लोकांनी मृत्यूला कवटाळले. वाहतूकदारांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, दखल घेतली गेली नाही. यामुळे सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करून रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी टेंभूरखेडा येथील नागरिकांनी केली आहे.