कुंपणच खाते शेत : कारवाई कोण करणार?
धारणी : ‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण प्रचलित आहे. येथील तहसील कार्यालयात या म्हणीचा प्रत्ययदेखील आला आहे. दंडात्मक वा फौजदारी कारवाईसाठी जप्त केलेली रेती चक्क तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहासाठी वापरली जात असल्याचा अफलातून प्रकार येथे उघड झाला आहे.
ज्यांच्याकडे सांभाळ करण्याची जबाबदारी असते, त्यांच्याकडून त्या वस्तूचा गैरवापर होत असेल, तर अशावेळी कोणी कोणावर विश्वास करावा, असा ‘कुंपणच शेत खाते’ चा अर्थ धारणीत वास्तवात उतरला आहे. तहसील कार्यालयात रेतीचोरीप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलींच्या रांगा लागल्या आहेत. काही ट्रॅक्टर खाली आहेत, तर काही ट्रॅक्टरमध्ये गौण खनिज आहे. अशाच एका ट्रॉलीत रेती होती. तो ट्रॅक्टर एक ते दीड वर्षांपासून तहसील कार्यालयाचा आवारामध्ये उभा आहे. पुढील कारवाई होईपर्यंत व ते वाहन न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधिताला सुपूर्दनाम्यावर परत करेपर्यंत संपूर्ण जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. मात्र, तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रॉलीमधून रेती काढून ती तहसीलदारांच्या चेंबरलगत होत असलेल्या शौचालय बांधकामात वापरली जात आहे. हा सर्व प्रकार तेथे ये-जा करणाऱ्यांनी बघितले. यानंतर ती छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. तहसीलदारांच्या चेंबरमध्ये स्वतंत्र शौचालय नसल्यामुळे शौचालयाचे नवीन बांधकाम दोन दिवसांपासून सुरू आहे. या बांधकामामध्ये जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधील रेतीचा वापर राजरोस सुरू आहे.
एसडीओंचा लक्षवेध
साधारणपणे एक घमिले रेती ट्रॅक्टरमध्ये आढळल्यास थेट ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून जवळपास सव्वा लाख रुपये दंडाची वसुली करण्याचा सपाटा लावणाऱ्या महसूल विभागाने जप्त करण्यात आलेल्या ट्रॉलीमधील रेतीचा गैरवापर चालविला आहे. त्यांच्यावर एसडीओ कारवाई करतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे. एकीकडे घरकुलासाठी रेती उपलब्ध होत नसताना, रेतीसाठी भटकणाऱ्या नागरिकांची वणवण महसूलला दिसत नाही. जप्त करण्यात आलेल्या ट्रॉलीमधील रेतीचा वापर स्वत:च्या आवारातील, अखत्यारीतील स्वच्छतागृहासाठी केला जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया येथे उमटली आहे.
कोट यायचा आहे तहसीलदारांचा
-----------
पान २ ची बॉटम