भातकुली : लघुदाब, उच्चदाब आणि सौर यंत्रणेद्वारे नवीन वीज जोडण्यांना गती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सौर कृषिपंपासाठी जिल्ह्यातून एकूण ३ हजार ३१३ अर्ज दाखल करण्यात आले. ६३० अर्ज नाकारण्यात आले, तर २ हजार ६५७ अर्जांना मान्यता देण्यात आली. यातील १ हजार ५३३ शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा केला आहे. ४८ शेतकऱ्यांनी रक्कम भरलेली नसून, ७० अर्ज संयुक्त सर्वेक्षणात नाकारण्यात आले आहे. एकूण १ हजार ३४९ कृषिपंप स्थापित झाले असून, ६६ ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे.
नवीन कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी लघुदाब, उच्चदाब आणि सौर यंत्रणेद्वारे कृषिपंप वीजजोडण्या देण्यात येतील. वीज खांबापासून २०० मीटरपर्यंत लघुदाब, २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस), तर ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांची वीजजोडणी सौर कृषिपंपाद्वारे देण्यात येणार आहे. नवीन कृषिपंपांना वीजखांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर तर २०० मीटरपर्यंत एरीयल बंच लघुदाब वीजवाहिनीद्वारे तीन महिन्यांत महावितरणच्या खर्चाने वीजजोडणी देण्यात येईल. यासोबतच शासन अनुदानातून उच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषिपंपांच्या वीजजोडण्या एका वर्षाच्या आत देण्यात येतील.
बॉक्स १
- तर मिळणार परतावा
समर्पित वितरण सुविधेनुसार (डीडीएफ) कृषिपंपांच्या नवीन वीजजोडणीचा खर्च वीज ग्राहकांनी स्वत: केल्यास ६०० मीटरपर्यंतच्या वीज जोडण्यांच्या खर्चाचा परतावा वीज बिलांमधून देण्यात येणार आहे. मात्र, ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील खर्चास हा परतावा मिळणार नाही तसेच वीज ग्राहकांनी पारंपरिक वीज जोडणी थकबाकीच्या रकमेचा भरणा करून कायमस्वरूपी खंडित केल्यास त्यांना सौर कृषिपंपाची नवीन वीज जोडणी घेता येणार आहे.
--------------------------