अनेकांची झोप उडाली : राजकारण बदलाचे संकेतचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : आता गावचा सरपंच होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार करून तो विधी व न्याय विभागाला पाठविल्याच्याृ वृत्ताने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक भावी सरपंचांची झोप उडाल्याचे चित्र आहे. सरपंचाच्या निवडीसाठी दहावी उत्तीर्ण असण्याची अट लागू झाली तर आपले कसे होणार, या विचाराने ग्रामीण भागातील राजकारण्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची मुदत येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबर तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यात २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात सरपंचाला मिनी आमदार समजले जाते.अत्यंत प्रतिष्ठेचे हे पद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय मंडळी यानिवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावतात. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काही तालुक्यांतील गावांमध्ये अनेक राजकारण्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, ग्रामीण भागातील जुनी जाणकार राजकारणी मंडळी अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे ते दहावी पासची अट पूर्ण करू शकत नाहीत. दिग्गजांचाच ग्रामीण भागात वरचष्मा असल्याने अद्यापही येथे तरूणांना प्राधान्य मिळत नाही, हे वास्तव आहे. परंतु, येणाऱ्या निवडणुकीत सरपंचपदासाठी किमान दहावी उत्तीर्णचा नियम ग्रामविकास विभागाकडून लागू करण्यात येत असल्यामुळे अनेक दिग्गजांना या निर्णयाचा फटका बसू शकतो आणि आपोआपच शिक्षित तरूणांना प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणालाच वेगळी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शैक्षणिक अटीमुळे निवडणुकीस मुकाव्या लागणाऱ्या भावी सरपंचांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हा नियम अनेक दिग्गजांचे राजकारण संपुष्टात आणणारा ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. २३ ग्रामपंचायतींची सन २०१८ मध्ये संपणार मुदतअमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांतील २६९ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. तसेच २०१८ च्या जानेवारी महिन्यामध्ये २३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
‘दहावी पास’ची अट, भावी सरपंच हैराण
By admin | Updated: June 8, 2017 00:13 IST