बैठक : यशोमती ठाकूर यांची मागणीअमरावती : निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील धारवाड, दुर्गवाडा या गावांच्या पुनर्वसनाची कामे त्वरित पूर्ण होण्याची मागणी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली.बिल्दोरी नाल्यावरील पुरात एकाच परिवारातील चार व्यक्ती वाहून गेल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. या पार्श्वभूमिवर पुनर्वसनाची कामे व बिल्दोरी नाल्यावरील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील धारवाडा, दुर्गवाडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामधील अनेक कामे रखडली आहेत. यामध्ये प्राथमिक शाळा, समाज मंदिर, रस्ते, विद्युतपुरवठा, स्मशानभूमी, बाजार ओटे आदी कामे अद्यापही व्हायची आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घराचे अनुदानही मिळालेले नाही, शेती वहीवाटीच्या रस्त्याची कामे रखडली आहे, बिल्दोरीच्या नाल्यावरील पुलाचे काम अद्याप रखडले आहे आदी विषयी आ. ठाकूर यांनी बैठकीत मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रखडलेली कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, पुनर्वसन अधिकारी देशपांडे, देशमुख तसेच रितेश पांडव, वैभव वानखडे, राजू निर्मल, ऊमेश ठाकरे, उमेश वाकोडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धारवाड, दुर्गवाड्यातील पुनर्वसनाची कामे पूर्ण करा
By admin | Updated: August 11, 2015 00:32 IST