फेब्रुवारीत नव्या सदस्यांची नियुक्ती : खोडके, शेखावतांच्या चर्चेंनंतर तिढा सुटणारअमरावती : महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्यात झालेल्या करारानुसार चर्चेनंतर तिढा सुटणार असे संकेत आहे.महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटची सत्ता आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, झोन सभापती, विशेष समिती सभापती, उपसभापती असे सत्तावाटपाचे सूत्र ठरवून काँग्रेस, राष्ट्रवादी गत चार वर्षांपासून कायम आहे. ९ मार्च २०१६ रोजी विद्यमान स्थायी समितीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. स्थायी समितीमध्ये असलेल्या १६ सदस्यांपैकी ८ सदस्य नियमानुसार निवृत्त होणार आहेत. नव्याने ८ सदस्य फेब्रवारीत होणाऱ्या आमसभेत नियुक्त केले जाणार आहेत. सभापती कोण? हे फेब्रुवारीमध्ये सदस्य नियुक्तीनंतर स्पष्ट होणार आहे. परंतु सभापतीपदासाठी अनेक सदस्य इच्छुक आहेत. विशेषत: मुस्लिम नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये ही डोकेदुखी प्रचंड वाढली असून माजी आ. रावसाहेब शेखावत, पक्षनेता बबलू शेखावत हे त्रस्त झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजाला स्थायी समिती सभापतीपद मिळावे, यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविली जात आहे. मात्र महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सभापती पदासाठी मनोमिलन झाल्याशिवाय तिढा सुटणे शक्य नाही, हे वास्तव आहे. गतवर्षी महापौर, उपमहापौरपदाबाबत झालेल्या करारानुसार राष्ट्रवादी फ्रंटला स्थायी समिती सभापतीपद देणे अनिवार्य आहे, असा दावा संजय खोडके गटाकडून मांडला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये सभापतीपदाबाबत नेत्यांनी मौन धारण केले आहे. काही नगरसेवक सभापतीपद मिळवून दुसरा, तिसरा विक्रम नोंदविण्यासाठी धावपळ करीत आहेत. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासाठी सुरु झालेले राजकारण कोणते वळण घेईल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु संजय खोडके व रावसाहेब शेखावत यांच्यात अंतिम चर्चेनंतरच सभापतीपदाबाबत तोडगा निघेल. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सभापती पदावरून काही वेगळे राजकारण होते काय? भाजप, शिवसेना बारकाईने लक्ष ठेवून आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीत स्थायी समिती सभापतीसाठी स्पर्धा
By admin | Updated: January 26, 2016 00:17 IST