गुडेवार परतले : अधिकाऱ्यांच्या कारभाराची गिणती सुरुअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार रविवारी अमरावतीत पोहोचले. १५ दिवसांपासून रजेवर असलेले महापालिका आयुक्त सोमवारी ८ जून रोजी पूर्ववत कामकाज सांभाळणार असल्याने अधिकाऱ्यांच्या कारभाराची गिणती पुन्हा सुरु होणार आहे. २३ मे पासून रजेवर गेल्यानंतर आयुक्त गुडेवार यांचा प्रभार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यादरम्यान जिल्हाधिकारी गित्ते यांनी अतिरिक्त चटईक्षेत्र (एफएसआय) शहरात लागू करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. १५ दिवस मोकळेपणाने कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्त गुडेवार सोमवारपासून कामकाज सांभाळणार असे कळताच धडकी भरली आहे. जुन्या, नवीन प्रकरणांची चौकशी, तपासाची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्यामुळे सोमवार ते शनिवार पुन्हा ‘गुडेवारां’चीच चर्चा शहरात रंगण्याची चिन्हे आहेत. १५ दिवसांपूर्वी रजेवर जाण्यापूर्वी जी कामे करण्याचे आदेश गुडेवारांनी अधिकाऱ्यांना दिले होते, ती कामे झालीत अथवा नाही, हे तपासले जाईल. शहरातील सात संकुलांचे अतिक्रमण, महापालिका संकुलातील गैरव्यवहार, शिक्षण विभागाचे शुध्दीकरण, नाले सफाईची परिस्थिती, घरमोजणी अभियान, कचरा व्यवस्थापन, सफाई कंत्राटदारांची थकीत देयके, अपहाराची प्रकरणे आदी कामाकाजांचा ते आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी आयुक्त गुडेवार कोणत्या विषयात हात घालून कामकाजाची सुरूवात करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)महिला फायबर टॉयलेट प्रकरणीअधिकाऱ्यांवर गंडांतर?महिलोंसाठी खरेदी करण्यात आलेल्या फायबर टॉयलेट प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. फायबर टॉयलेटचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त गुडेवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी या अहवालावर नजर टाकताना भांडार विभाग, लेखापाल विभाग, बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.
आयुक्तांचा महापालिकेत आजपासून पुन्हा ‘वार’
By admin | Updated: June 8, 2015 00:36 IST