नागरिकांच्या मागणीला यश : सिंचनाची सोय होणार
अंजनगाव बारी : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प खर्चाच्या दृष्टीने परवडणारा नसल्याने रद्दबातल ठरवला होता. परंतु, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी लाभदायक असल्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.
प्रकल्पामुळे शेतातील विहिरींची पातळी कायम राहणार आहे. परिसरात जवळपास १५०० कृषिपंप आहेत. दोन हजार हेक्टर जमीन कोरडवाहू असून, टिमटाळा प्रकल्प झाल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. हा प्रकल्प रद्द झाल्याची चर्चा पसरताच शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, टिमटाळा-अंजनगाव बारी डांबरी रस्त्याच्या मधोमध पुलाचे काम सुरू झाले मात्र, पुल बांधतांना लोखंडाचा वापर होत नसल्याची नागरिकांची चर्चा आहे.